Pune : वैदूवाडी येथील म्हाडातील नागरिक सात वर्षांपासून पाण्याच्या प्रतिक्षेत

पुणे : हडपसर (वैदूवाडी- गोसावीवस्ती) येथील म्हाडाच्या (एसआरए) सात मजली इमारतीमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांना सार्वजनिक नळावरून पाणी न्यावे लागत आहे. इमारतीमधील चेंबर तुंबले असून, सोसायटी परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रामटेकडी-वानवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आरोग्य कोठीमध्ये वारंवार तक्रार करूनही कोणी दखल घेतली नाही, असे येथील नागरिकांनी सांगितले.

पर्वती पायथा (सिंहगड रोड) येथील झोपडपट्टीधाराकंचे वैदूवाडीतील (गोसावीवस्ती, मंत्री चौक) येथे म्हाडाने बांधून दिलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सोसायटीमध्ये स्थलांतर केले आहे. मागिल सात वर्षांपासून या इमारतीमधील नागरिक पाण्यासाठी परिसरात भटकत होते. सहा महिन्यापूर्वी सार्वजनिक नळकोंडाळे दिले असून, तेथून ही मंडळी पाणी सातव्या मजल्यावर घेऊन जात आहेत. या इमारतीमध्ये सुमारे 100 कुटुंबे राहत आहेत.

लहान-मुलांसह ज्येष्ठ नागरिक भर उन्हात पाण्यासाठी डबे घेऊन रांगेत थांबतात. येथील शेजारी इमारत आहे, तेथे पाणी आहे. मात्र, या इमारतीमध्ये पाणी जात नाही. दोन्ही इमारतीसाठी एक पाण्याची टाकी आहे. दोन स्वतंत्र मोटारी बसविल्या आहेत. मात्र, या सोसायटीमध्ये पाणी जात नाही. जलवाहिनी खराब झाली आहे की, मोटार खराब आहे, याविषयी येथील नागरिकांना कोणीही काहीही सांगत नाही, अशी परिस्थिती आहे. आरोग्य कोठी अवघ्या दोन मीटर अंतरावर आहे. पालिकेची कर्मचारी-अधिकारी येथून दररोज जातात, त्यांच्याकडे वारंवार तक्रार केली आहे. मात्र, येथील समस्या सोडविण्यासाठी वा पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही, अशी तक्रार येथील नागरिकांनी केली.

दरम्यान, साहसी फाउंडेशनच्या अध्यक्षा मयुरी बामणे म्हणाल्या की, आरोग्य कोठी आणि पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार केली आहे. मात्र, आरोग्य अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी दखल घेत नाहीत. ड्रेनेज जोडण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे काही करता येत नाही. पाणीपुरवठा अधिकारी आतापर्यंत आलेच नाहीत. पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांनी वर्गणी काढून दोन वेळा नवीन मोटार बसविली. बिल्डरकडे तक्रार केली, त्यालाच ही इमारत बांधल्याचे आठवत नाही, अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.