Pune : बदलत्या जीवनशैलीमुळे शहरात डोळ्यांच्या समस्येनं नागरिक त्रस्त, ‘मायोपिया’ (अंधुक दिसणे) रूग्णांच्या संख्येत वेगाने वाढ : नेत्रतज्ज्ञ डॉ. हेमंत तोडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात औद्योगिकीकरण, शारीरिक समस्या आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वाढता वापर यासारख्या बाबींमुळे शहरी लोकांमध्ये मायोपिया म्हणजेच डोळ्यांची समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते. बऱ्याचदा लहान वयातच मोबाईल किंवा गॅझेटचा वापर केल्यानं जवळच्या वस्तू सहज दिसतात. परंतु, दूरच काहीच दिसत नाही, अशा समस्या सध्या वाढू लागल्या आहेत. मात्र, नियमित व्यायामाद्वारे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे आणि मोबाइल फोनचा वापर मर्यादित ठेवणे अशा जीवनशैलीतील बदलांमुळे ही समस्या दूर केली जाऊ शकते. तसेच, डोळ्यांची वेळोवेळी तपासणी केल्यास या समस्येपासून आपलं स्वतःचा बचाव करू शकतो.

(मायोपिया) एक दृष्टीदोष आहे. ज्यामध्ये डोळ्यांच्या सामान्य कार्यामध्ये दूरवरच्या वस्तूंमध्ये बदल दिसून येतात. मायोपिया असलेल्या व्यक्तीस सहसा जवळ असलेल्या चांगल्या वस्तू दिसतात. परंतु त्याच्यापासून अनेक मीटर अंतरावर असलेल्या वस्तू पाहण्यात अडचण येते. डोळ्याच्या स्नायू कमकुवत होण्यामुळे देखील मायोपिया होऊ शकतो. याकरता स्नायूंना बळकट करण्यासाठी शारीरिक व्यायाम हा उत्तम पर्याय आहे. एखाद्याच्या डोळ्याच्या आकारामुळे हलकी किरणे चुकीच्या पद्धतीने वाकणे आणि आपल्या डोळयातील पडद्यात दोष निर्माण झाल्यास समोरील वस्तू न दिसण्याची समस्या उद्भवू शकते. याशिवाय सतत कॉम्प्युटरवर काम करत राहिल्यावरही धुसर दिसायला लागते. शहरी भागात राहणाऱ्या लोकांसाठी ही समस्या चिंताजनक बनली आहे.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ डॉ. हेमंत तोडकर म्हणाले की, ”कॉर्नियातील बिघाड, औद्योगिकीकरण, इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा वाढता वापर, अनुवांशिकता, घरामध्ये बसून तासनतास लॅपटॉपवर काम करणं अशा विविध कारणांमुळे शहरी भागातील लोकांमध्ये मायोपिया हा डोळ्यांची संबंधित समस्या वाढतेय. याशिवाय सध्या लॉकडाऊनमुळे ऑफिसच काम आणि शाळेचा अभ्यास करण्यासाठी लॅपटॉप किंवा मोबाईलचा वापर वाढला आहे. मायोपिकाचे रूग्ण वाढण्यामागील हे मुख्य कारणं आहे. १०० पैकी ४ जणांना शारीरिक कारणांमुळे मायोपिया होतो, तर १०० पैकी १२ जणांना जीवनशैलीशी संबंधित चुकीच्या पद्धतीमुळे हा आजार होतो.”

मायोपिया असणार्‍या प्रौढांमध्ये अंधुक दृष्टी, डोकेदुखी आणि रात्रीच्या वेळी वस्तू पाहण्यात अडचण यासारखी लक्षणे दिसून येतात, तर मुले सतत डोळे मिचकावतात किंवा वारंवार डोळे चोळतात. मायोपियामुळे एखाद्याच्या जीवनाची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते. मायोपिया या आजारावर वेळीच उपचार न केल्यास रेटिना डिटेचमेंट, मोतीबिंदू, काचबिंदू यासारख्या गुंतागुंतांना समस्या उद्भवू शकतात.

“जीवनशैलीत चांगला बदल केल्यास मायोपिया ही समस्या टाळता येऊ शकते. मोठ्यांसह लहान मुलांनी गॅझेटचा वापर किती करावा, हे ठरवलं पाहिजे. यासाठी वेळेचे नियोजन करा. नियमित शारीरिक व्यायाम करणं गरजेचं आहे. यासाठी धावणं, चालणं आणि योगा करणं अतियश फायदेशीर ठरू शकतं. नियमित नेत्र तपासणीसाठी जा आणि योग्य चष्मा किंवा लेन्स निवडा. तसेच, समस्या किती गंभीर आहे यावर अवलंबून डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात,”असे डॉ. तोडकर म्हणाले.