Pune News : पुणे पोलिसांकडून 10 लाख रूपये किंमतीचा 50 किलो गांजा जप्त, एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहर पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तबल 50 किलो गांजा पकडला आहे. पुण्यात तो विक्री करण्यासाठी आणल्यानंतर पोलिसांनी सापळा कारवाईत पकडले गेले आहे.
अण्णा मोहन जाधव (वय 26, रा कोलवाडी ता.हवेली पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अवैध प्रकार वाढले असल्याचे गेल्या काही दिवसात दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त घालत कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान अमली पदार्थ विरोधी पथक हडपसर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांना मांजरी स्मशानभूमी येथे एकजण रस्त्यावर टेम्पो घेऊज उभा असताना तो संशयास्पद अवस्थेत दिसला. पथकाने त्याला विचारपूस करण्यास सुरुवात केली असता तो उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने गाडीची झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना 50 किलो गांजा आढळला. त्यानंतर पोलिसांनी बोलेरो चालक अण्णा जाधव याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली.

त्यावेळी त्याचा भाऊ सागर जाधव याने हा गांजा विक्री करण्यासाठी दिला असल्याचे सांगितले. अण्णा जाधव याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून 10 लाख रुपयांचा 50 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड व सहाय्यक निरीक्षक ढेंगळे यांच्या पथकाने केली आहे.