शहरात लॉकडाऊन काळात 5.75 लाखांचे 56 ग्रॅम MD जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात लॉकडाऊन काळात देखील मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री सुरू असून, गुन्हे शाखेच्या पथकाने मेथाफेटामाईन (एम.डी) पकडले आहे. दोघांकडून पावणे सहा लाखांचे 56 ग्रॅम एमडी जप्त केले आहे.
सकलेन अब्दुल बाकी कुरेशी (वय २३, रा. अलकुरेश हॉटेल जवळ, भिमपुरा, लष्कर कॅम्प), शकील रौफ सैय्यद (वय ४२, रा. इस्लामीया बेकरी जवळ, भाग्योदयनगर, कोंढवा ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सिहंगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा संकल्प वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे. पण शहरातील अमली पदार्थ तस्करी काही कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी पथके नेमून कारवाई केली जात आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली होती की, नवले ब्राीजजवळील डेक्कन पवेलीयन हॉटेल समोर दोन व्यक्ती या अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते, कर्मचारी मगर, गरुड, गुरव, बागवान, पवार, चालक येलपले यांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्याकडून ५६  ग्रॅम मेथाफेटामाईन (एम.डी), एक वॅगनर कार, दोन मोाबाईल फोन असा 5 लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयाने ३० जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.