Pune : हडपसरमधील कालवा स्वच्छ करणे म्हणजे ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांचे उखळ पांढरेच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  हडपसरमधील कालवा स्वच्छ करण्याच्या नावाखाली ठेकेदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी खिशा भरण्याचेच काम केले आहे. कारण कालव्यातील गाळ काढून रस्त्यावर टाकला आहे. तो गाळ पुन्हा रस्त्यावरून कालव्यात जात आहे. त्यामुळे कालव्यातील गाळ काढण्यासाठी पूर्ण पैसे घ्यायचे मात्र काम पूर्ण करायचे नाही, हे धोरण पालिका प्रशासनाने अवलंबले आहे. ठेकेदाराने काम बरोबर केले आहे की नाही, हे पाहण्यासाठी पालिकेचे अधिकारी कधी घटनास्थळी येत नाहीत, त्यामुळे ठेकेदार बिनदिक्कतपणे अर्धवट काम करून पैसे कमावत असल्याचा थेट आरोप स्थानिक नागरिक करू लागले आहेत. त्यापेक्षा कालव्यातील गाळ काढू नका, कालवा फुटल्यानंतर पाटबंधारे विभाग काय निर्णय घ्यायचा ते घेईल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून देण्यात येत आहे.

हडपसरमधून वाहणाऱ्या मोठ्या आणि बेबी कालव्यातील काही ठिकाणी स्वच्छता केली. मात्र, लक्ष्मी कॉलनी (आर्मी पुल) येथील कालव्यातून कचरा काढून रस्त्यावर टाकला आहे. त्यामुळे गंगानगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होत आहे. कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून, उन्हामुळे कचरा वाळला असून, धूळ आणि प्लास्टिक, पालापाचोळा उडून वाहनचालकांच्या डोळ्यात जात असल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनी तीव्र संताल व्यक्त केला आहे. कालवा स्वच्छ करण्याच्या नावाखाली संबंधितांनी स्वतःचा खिसा भरला. अर्धवट काम करून स्थानिकांना त्रास देण्याचा नवा फंडा ठेकेदार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. आर्मी पुलालगत कै. हेमंत करकरे आणि खासदार स्व. विठ्ठल तुपे अशी दोन पालिकेची उद्याने आहेत.

यातील करकरे उद्यानामध्ये नागरिक वॉकिंग आणि व्यायाम करण्यासाठी दररोज येतात. मात्र, तुपे उद्यानात राडारोडा पडला असून, उद्यानाची दूरवस्था झाल्यामुळे कोणीही फिरकत नाही. या उद्यानाच्या बाजूने कालव्यालगत कचरा टाकला आहे. त्यामध्ये परिसरातील नागरिक राडारोडा, हॉटेलमधील कचरा टाकत आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, वाहनचालकांना अपघाताचा धोका वाढला आहे. कचरा वाळला असून, कचरा गोळा करणाऱ्यांकडून तो पेटवला जात आहे. त्यामुळे दररोज सकाळी आणि सायंकाळी स्थानिक नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.

हडपसरनगरी नव्हे, कचरा नगरी
शहर आणि परिसरातील सर्व ठिकाणचा कचरा गोळा करून प्रक्रिया करण्याच्या नावाखाली हडपसरमधील कचरा डेपो आणि डंपिंग स्टेशनमध्ये आणला जातो. कचरा बंद करण्यासाठी स्थानिकांकडून वारंवार आंदोलने करण्यात आली. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींची एकी नसल्यामुळे कचरा डेपो कमी होण्याऐवजी वाढत करण्यातच पालिका प्रशासनाने धन्यता मानली आहे. कोथरूडसारख्या ठिकाणचा कचरा डेपो बंद होतो, नवीन ठिकाणी कचरा प्रकल्प होणार म्हटल्याबरोबर स्थानिकांनी तीव्र विरोध करताच तेथे कचरा प्रकल्प झाला नाही. मात्र, हडपसरमधील स्थानिक नेते आंदोलन करतात, थेट विरोध करीत नाहीत, त्यामुळेच कचरा प्रकल्प कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे हडपसर कचरानगरीच म्हणूनच आकार घेत असल्याचे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही.

दरम्यान, लक्ष्मी कॉलनीतील शशिभूषण होले म्हणाले की, लक्ष्मी कॉलनी येथील दोन्ही कालव्यालगतची जागा पाटबंधारे विभागाची आहे. त्यामुळे पालिकेच्या ठेकेदाराकडून कालव्यातील गाळ काढून कालव्यावरील रस्त्यावर टाकला जात आहे. तसेच बांधकाम व्यावसायिकांसह हॉटेलचालक राडारोडा आणि कचरा कालव्याच्या मोकळ्या जागेत टाकत असल्याने कालव्यातील पाणी दूषित होत आहे. परिसरात कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नव्या कालव्यातील पाण्यावर लोणी काळभोर, उरुळी कांचन, फुरसुंगी या ग्रामपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजना आहेत. कालव्यातील दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने तातडीने कालव्याची स्वच्छता करावी, तसेच राडारोडा आणि कचरा टाकणाऱ्यावर कडक कारवाई केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.