पर्यटकांसाठी आकर्षण असलेला भुशी डॅम खुला, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोणावळ्याचा पिकनिक स्पॉट भुशी डॅम आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील भुशी डॅम आणि परिसरातील इतर धरणं आता पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना जी बंदी घालण्यात आली होती ती आता उठवण्यात आली आहे.

अनलॉकच्या प्रक्रियेत आता सर्व गोष्टी सुरू होत आहेत. सर्व हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. अशात आता पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत. भुशी डॅम पुणे आणि मुंबई या दोन बड्या शहरांच्या मध्यावर आहे. त्यामुळं पावसाळ्यात या परिसरात नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. यंदाचा पावसाळा पर्यटनाविना गेला. आता मात्र हा परिसर पर्यटकांसाठी खुला झाला आहे.

भुशी डॅम हा पर्यटकांसाठी कायमच चांगला पर्याय राहिला आहे. पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या इतर लहान मोठ्या उद्योगधंद्यावर लॉकडाऊनच्या काळात मोठा परिणाम झाला. आत त्यांनाही या निर्णयामुळं हातभार लागणार आहे.

नागरिकांसाठी लोणावळा आणि आसपासचा परिसर पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. परंतु असं असलं तरी कोरोना संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळं पर्यटकांनी काही नियम पाळतच पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.