Pune : लसीकरणाचा गोंधळात गोंधळ ! ‘मतदारांना’ खुश करण्यासाठीची माननियांची ‘चमकोगिरी’ अंगलट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   लसीकरण केंद्रांना महापालिकेने पुरविलेल्या लसींचा साठा आणि प्रत्यक्षात केंद्रांवर पाहणीदरम्यान सांगण्यात येणार्‍या लसींमध्ये मोठ्याप्रमाणावर तफावत आढळून येत आहे. तसेच अनेक ठिकाणी तासनतास रांगेत उभे राहाणार्‍या रुग्णांना ऐनवेळी लस संपल्याचे कारण सांगितले जात असून ‘माननियांच्या ’ यादीतील नागरिकांचे बिनबोभाट लसीकरण केले जात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्याने पुण्यातील ‘लसीकरण’ मोहीमेवर ‘राजकिय ताबा’ मारल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

शहरात एक मे पासून फक्त महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. यापैकी ५ केंद्रांवर कोव्हॅक्सीन ही लस देण्यात येत असून उर्वरीत ठिकाणी कोव्हिशिल्ड लसींचे डोस देण्यात येत आहे. केंद्र शासनाने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा निर्णय घेतला परंतू एप्रिल महिनाअखेरीपासून लसींचा पुरवठाच कमी होउ लागल्याने लसीकरण मोहीमेत गोंधळ उडाला आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरणासाठी केवळ पाचच केंद्रांवर सुविधा उपलब्ध असून यासाठी कोविन ऍपवर नोंदणी करावी लागत आहे. अवघ्या मिनिटभरात अपॉईंटमेंट फुल्ल होत असल्याने या केंद्रांवर रांगा लागत आहेत.

दुसरीकडे उर्वरीत सर्व केंद्रांवर ४५ वर्षावरील नागरिकांसाठी प्रामुख्याने कोव्हिशिल्ड लस देण्याची सुविधा आहे. मात्र, लसींचा अत्यल्प साठा असल्याने सर्वच केंद्रांवर समप्रमाणात लस वाटप करण्याचा मध्यममार्ग प्रशासनाने स्वीकारला आहे. यापुर्वी करण्यात आलेल्या लसीकरणाच्या तुलनेत दोन दिवसांपुर्वी उपलब्ध झालेल्या लसींतून दुसर्‍या डोसचे वितरण करताना साधारण १०० ते १५० डोस वितरीत करण्यात आले आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने प्रत्येकच केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. परंतू या गर्दीचे नियंत्रण करण्यात ‘राजकिय’ कार्यकर्ते आणि माननीय मदतीपेक्षा अडथळाच अधिक करत असल्याच्या तक्रारी विविध भागांतून सातत्याने येत आहेत. मागील दोन दिवसांपासून काही केंद्रांवर केवळ २० ते ४० डोस मिळाल्याचे सांगितले जात असून परस्पर तकलादू टोकन सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. अशा ठिकाणी उर्वरीत डोस मतदारांचा ‘प्राधान्यक्रम’ ठरवून दिले जात आहेत.

टोकन मिळावे यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून नागरिक लसीकरण केंद्राच्या बाहेर रांगा लावत आहेत. यामध्ये दुसर्‍या डोससाठी येणार्‍या ४५ पुढील व प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. लसीकरण केंद्रांवरील कर्मचारी व नागरिकांमध्ये वादाचे खटके उडत असून आज खराडी येथे तर एक नगरसेवक आणि एका राजकिय पदाधिकार्‍याची अक्षरश: हातापायी झाली. तर शासनाच्या लसीकरणातून मतदारांपुढे चमकोगिरीचा प्रयत्न करणार्‍या माननीयांनाही काही ठिकाणी नागरिकांकडून शिव्यांची लाखोली वाहीली जाउ लागली आहे.

दरम्यान महापालिकेने पुरविलेल्या लस व लसीकरण केंद्रावरील लसींच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असून भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप कॉंग्रेसचे पदाधिकारी कृषिकेश बालगुडे यांनी केला आहे. सावित्रीबाई फुले दवाखान, कलावती मावळे दवाखाना व अन्य काही केंद्रांवरील प्रत्यक्ष पाहाणीमध्ये ही बाब समोर आली आहे. प्रत्यक्षात लस उपलब्ध असताना लस उपलब्ध नसल्याचे नागरिकांना सांगण्यात येत आहे. तेथील कर्मचारी नागरिकांशी उद्धटपणे बोलतात. या प्रकारणी सखोल चौकशी व्हावी व नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या संबंधीत अधिकारी/ कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण शहरातील सगळ्या केंद्रावर करण्यात यावे, अशी मागणीही बालगुडे यांनी केली आहे.

मतदानाप्रमाणे ‘बोगस’ लसीकरणाचा संशय

शहरातील अनेक केंद्रांवर लसीकरणाच्या दुसर्‍या डोससाठी नोंदणी केल्यानंतर अनेकांना लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांना मागे फिरावे लागत आहे. परंतू यानंतर नोंदणी केलेल्या नागरिकांना काही तासांनी त्यांनी दुसरा डोस घेतल्याचे मेसेज जात आहेत. विशेष असे की ज्यावेळी रजिस्ट्रेशन केले जाते त्यानंतर चार ते सहा तासांनी हे मेसेज जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मतदानाप्रमाणेच या रजिस्ट्रेशनचा ‘बोगस’ लसीकरणासाठी वापर केला जात असल्याचा संशय बळावू लागला आहे. कोविन अ‍ॅप हे केंद्र शासनाच्या अखत्यारित असल्याने आमच्याकडे काहीच अधिकार नसल्याचे स्थानीक प्रशासन सांगत आहे.