Pune : हडपसरमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हेंसमोरच काँग्रेस-राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांत ‘जुंपली’

पुणे : हडपसरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, श्रेयवादासाठी नागरिकांना वेठीस धरले जात आहे, ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. हडपसर गाडीतळ येथील बंटर बर्नाड स्कूलमधील लसीअभावी बंद ठेवले होते. मात्र, खासदार डॉ. अमोल कोल्हे येणार असल्याने सुरू ठेवले होते. त्यामुळे श्रेयवादासाठी राजकरण करण्यासाठी नागरिकांना वेठीस धरू नका, असा खडा सवाल काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रशांत सुरसे यांनी विचारला. दरम्यान, माजी महापौर वैशाली बनकर म्हणाल्या की, श्रेयवादाचे राजकारण आणू नये, नागरिकांसाठीच काम केले जात आहे. अशी शाब्दिक चकमक सुरू असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला.

सुरसे म्हणाले की, लस द्यायची नव्हती तर नागरिकांना अगोदर का सांगितले नाही, ज्येष्ठ आणि अपंग नागरिक उन्हातान्हात आले, त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला, ही बाब मी सहन करणार नाही. लसीकरण केंद्र मी सुरू केले आहे. मला श्रेय नको आहे, नागरिकांना सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी काम करीत आहे. मात्र, काही मंडळी राजकारण करीत आहे, ते खपवून घेतले जाणार नाही, तुम्ही आणि मी एकत्र आहोत, असे सांगतो. मात्र स्थानिक मंडळी याचे राजकारण करीत आहेत, ही बाब त्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमोर मांडली. गोंधळेनगरमधील मनपाच्या बनकर शाळेत कोविड सेंटर सुरू केले आहे. तेथे तपाणी कीट कमी पडत आहेत, कोविड तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी नाही, महिलांना स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, श्रेयवादासाठी नगरसेवक लुडबूड करीत आहेत. मात्र, त्यामुळे कोरोनाबाधितांची हेळसांड होत आहे, ही बाब अत्यंत लाजीरवाणी आहे. नागरिकांच्या जीविताशी खेळ नको आहे, मी नागरिकांसाठी काम करत आहे. मला राजकारण करायचे नाही, अशा एक ना अनेक तक्रारींचा पाढाही त्यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदारांसमोर मांडला. यावेळी खासदारांनी आपण सर्वजण नागरिकांना सुविधा देण्यासाठी काम करीत आहोत, असे सांगून प्रकऱणावर पडदा टाकला.

हडपसरमधील स्वाभिमानी महिला संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी सुरसे की, हडपसरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, प्रसासनाकडून याची योग्य दखल घेतली जात नाही. रेमडिसिव्हर इंजेक्शन, कोरोना लस, ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत, त्यामुळे कोरोनाबाधित आणि त्यांच्या कुटुंबीयांची ससेहोलपट होत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकारी दुर्लक्ष करीत असून, श्रेय लाटण्यासाठी मात्र नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहे, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माजी महापौर वैशाली बनकर म्हणाल्या की, बनकर कोविड सेंटरमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी पालिकेकडून कागदावर दाखविले आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्याकूडन पुरविले जात नाहीत. ऑक्सिजन सिलेंडर आहेत, मात्र ते दहा मिनिटांत बंद पडतात. पालिका आयुक्तांकडून यंत्रणा कार्यक्षमतेने दिली जात नाही. टॉयलेट आणि पाण्याची व्यवस्था मागिल वर्षी केली होती. मात्र, आता वारंवार पाठपुरावा करूनही दिली गेली नाही. पालिका अधिकारी घटनास्थळावर येऊन पाहणी करत नाहीत. त्यामुळे त्यांना येथील अडचणी कशा समजणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. प्रशांत सुरसे यांच्या आरोपाविषयी त्या म्हणाल्या की, लसीकरण केंद्र व कोव्हीड टेस्ट सेंटरमध्ये प्रथम येतील त्यांना टोकन दिले जाते. सुरसे दहा टोकन मागतात, हे योग्य नाही, ऑनलाईन दुपारी साडेबारानंतर बोलावतो, आज लसीकरण केंद्र बंद होते, खासदारांना सिस्टीम कळावी म्हणून 50 लस घेऊन केंद्र सुरू ठेवले, यामध्ये राजकारण आहे, असे मला वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.