Pune : बँक ऑफ बडोदाच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बँक ऑफ बडोदाने खातेदार व ठेवीदारांसाठी लावलेले नियम जाचक असल्याचा आरोप करत बँकेच्या मार्केट यार्ड शाखेसमोर काँग्रेसच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले.

बँक ऑफ बडोदाने खातेदारांना त्यांच्या खात्यावर तीन वेळा वेळाच पैसे भरण्याची मुभा दिली आहे. त्यापेक्षा जास्त वेळा भरणा केल्यास प्रत्येक भरण्याला ४० रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच तीनपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी १५० रुपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय बँकेने ५० चेकच्या पुस्तकासाठी २५० रुपये दर निश्चित केला आहे. बँक ऑफ बडोदाने १ नोव्हेंबरपासून या नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. बँक ऑफ इंडिया, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक लवकरच या कायद्याची अंमलबजावणी करणार आहेत. मोदी सरकारने सामान्य बँक खातेदारांची लूट चालवली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रमेश अय्यर यांनी केला. मोदी सरकारने जाचक नियम रद्द करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी आंदोलकासमोर बोलताना दिला.

या आंदोलनामध्ये माजी महापौर कमल व्यवहारे, महिला काँग्रेस अध्यक्ष सोनाली मारणे, रमेश सोनकांबळे, रमेश शिंदे, अमरजित मक्कड, सीमा महाडिक, विठ्ठल गायकवाड, भरत सुराणा, हेमंत राजभोज, अविनाश अडसूळ, अकबर मणियार, महेश गायकवाड, सचिन आडेकर, आबा जगताप, सुरेश चौधरी, अन्वर शेख, इमाम हानुरे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.