Pune : घरातील जुनं कुलर ऑनलाइन विक्रीला काढणं पडलं महागात, सायबर भामट्यांनी 3 लाखाला गंडवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरातील जुने कुलर ऑनलाइन विक्री करण्याचा प्रयत्न एकाला चांगलाच महागात पडला आहे. त्या नागरिकाला सायबर चोरट्यांनी 3 लाख रुपयांचना गंडा घातला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात परेश माथूर (वय 44) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महंमदवाडी परिसरात रहातात. त्यांच्याकडे जुने कुलर होते. ते त्यांना विक्री करायचे होते. त्यामुळे त्यांनी याची जाहिरत ओएलक्सवर टाकली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांना संपर्क साधला. तसेच त्यांना कुलर आवडला असून, तो खरेदी करायचा असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडे पैश्याबाबत विचारपूस केली.

तर तुम्हाला पैसे पाठवल्यानंतर काही पैसे परत रिफड होतील, असे सांगत त्यांना पेटीएम क्युआरकोड स्कॅन करण्यास सांगत त्यातून आरोपींनी दिलेल्या बँक खात्यावर पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. त्यांनी एकूण 2 लाख 80 हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र तरीही त्यांना आणखी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले जात होते. त्यामुळे त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.