पुण्यात पोलीस निरीक्षकांची अनोखी शक्कल ! सायकलवर फिरुन कंटेंन्मेंट झोनमध्ये जनजागृती

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिस, महानगरपालिकेकडून वारंवार जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी कंटेंन्मेंट झोनमध्ये विशेष काळजी घेण्याच्या आवाहनासाठी दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चक्क सायकलवर फिरुन जनजागृती करीत आहेत. देविदास घेवारे असे त्यांचे नाव आहे.

दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तब्बल 12 ते 14 कंटेंन्मेंट झोन आहेत. कोरोनाचा आणखी फैलाव होऊ नये, यासाठी या भागांमध्ये विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हीच बाब लक्षात घेऊन देविदास घेवारे सायकलवर फिरुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देतात.

आमच्या हद्दीत 12 ते 14 कंटेंन्मेंट झोन असून बहुतांश झोपडपट्टयांचा भाग आहे. हे सर्व भाग बंद आहेत. कार जिथे पोहोचू शकत नाही, तिथे सायकलमुळे पोहोचणे शक्य होते असे घेवारे यांनी सांगितले आहे. व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. पण पुरेसा वेळ मिळत नाही. सायकल चालवल्यामुळे तेवढाच व्यायाम होतो आणि लोकांशी संवादही साधता येतो असेही त्यांनी सांगितले.