सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीनंतरच सत्ता स्थापनेचा निर्णय, ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सद्य स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलीक यांनी बैठकिनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. तसेच आम्ही काँग्रेस सोबत असून सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात सोमवारी बैठक होणार आहे. त्यांच्यात बैठक झाल्यानंतर मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते यांच्यामध्ये बैठक होऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली. शिवसेना-भाजपमधील वाद मिटत नसला तरी भाजपच्या नेत्यांना राज्यात युतीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास आहे. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी देखील राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. रावसाहेब दानवे औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप-शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांना साथ दिली आहे. मात्र, निकालानंतर दोन्ही पक्षामध्ये वाद निर्माण झाले. बाळासाहेब ठाकरे आज असते तर दोन्ही पक्षामध्ये असे टोकाचे वाद झाले नसते असे म्हणत त्यांनी राज्यात पुन्हा युतीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच सत्ता स्थापनेसाठी जनतेच्या बहुमताचा आदर केला पाहिजे असे सांगण्यासाठी विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. मात्र त्यांनी फोन उचलला नाही, असेही दानवे यांनी सांगितले. तर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील राज्यात युतीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Visit : Policenama.com