Pune : कोरोना महामारीत आधार आणि उपचाराची गरज – अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मंगेश बोराटे

पुणे : कोरोना जागतिक महामारी सुरू झाली आणि आरोग्य क्षेत्र हादरून गेले. सर्व संदर्भ बदलले, प्राधान्यक्रम बदलले. आज संपूर्ण जगातील शासन प्रशासन, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी औषध निर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ सर्वजण कोरोना महामारीवर चर्चा करीत आहेत. उपाययोजना विकसित करून त्या राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत, सर्व यंत्रणेंचे लक्ष यावर केंद्रित केले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली आणि शासकीय, निमशासकीय आणि खासगी रुग्णालयामध्येही उपाचारासाठी जागा मिळविण्यात मारामारी सुरू झाली. त्यामुळे छोट्या छोट्या हॉस्पिटलने पुढाकार घेऊन ऑक्सिजन बेडची उपलब्ध करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा एकमेकांना आधार देत मदत करण्याची वेळ आली आहे. आता कोरोनावर मात करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा प्रत्येकाने अवलंब करणे ही, काळाची गरज आहे, असे हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मंगेश बोराटे यांनी सांगितले.

डॉ. बोराटे म्हणाले की, हृदयरोग, पक्षाघात, कॅन्सर अशा इतर आजारांचे रुग्ण कुठे गेले, असा सूर सोशल मिडियाच्या माध्यमातून काही मंडळींनी आळवला. मात्र, त्यांच्या माहितीसाठी कुठलाही आजार संपला नाही. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रस्त्यावरील अपघात कमी झाले आहेत, त्यातही वर्दळ कमी म्हणून वेग वाढवून दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणारे बेजबाबदारही काही आहेत. त्यांच्यामुळे खूप जोराचा आघात होऊन एकापेक्षा जास्त फ्रॅक्चर होणे, छाती, पोटातील अवयवांना इजा होणे, मेंदूला मार लागल्याने रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. सध्या कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेचा प्राधान्यक्रम बदलला आहे. मात्र, कर्करोग, किडनीच्या विकाराचे डायलेसिस सुरू असणारे, हृदयरोगाचा किंवा पक्षाघाताचा आघात झालेले रूग्ण यांचे प्रचंड हाल होत आहेत, त्याचबरोबर कोरोनाशी सामना करावा लागत आहे. फ्लूसदृश्य, विषाणूजन्य आजार पूर्वीही होते, पण त्यावेळी दोन-चार दिवस ताप, सर्दी व अंगदुखी होऊन रूग्ण नंतर पूर्ण ठणठणीत होत होते. पण विषाणूंमध्ये जणुकीय बदल होत गेल्याने त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासाचे गुंतागुंतीचे प्रमाण वाढले आहे. सर्वच विषाणूजन्य आजार हे रूग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीशी छेडछाड करणारे असतात, जसे डेंग्यू, चिकनगुन्या आणि आताचा हा कोरोना हे सर्व रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रणालीमध्ये बिघाड करतात, हा आपल्या शरीराचा प्रतिसाद असतो, पण हा प्रतिसाद काही रूग्णांमध्ये विचित्र प्रकारे किंवा खूप जास्तच प्रमाणात काही रूग्णांमधे आढळतो. सध्या कोरोनाचे जे रूग्ण दगावतात त्यांच्या शरीरातील विविध घटकांवर यांचा परिणाम होताना दिसतो.

अस्थिरोगांबद्दल बोलायचे झाले, तर अशा विषाणूजन्य आजारानंतर सांध्याना सूज येऊन वेदना होणे, रोजच्या जीवनातील हालचाली करताना त्रास होणे अशी लक्षणं आढळतात. अशी लक्षणं आढळल्यास आणि त्वरित उपचार घेतल्यास सांध्यांची होणारी झीज, हानी टाळता येऊ शकते. कारण जेवढे दिवस सांध्याना सूज रहाते, त्याप्रमाणात सांध्यांची झीज होते आणि काही प्रमाणात सांधा वेदनादायी होतो. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनी सांधेदुखीचा काही त्रास जाणवल्यास वेळीच अस्थिरोग तज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरणार आहे. प्रतिबंधात्मक उपाय हे आजार झाल्यानंतर केले जाणाऱ्या उपचारांपेक्षा केव्हाही चांगले. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना विनंती आहे की सावधगिरीने हालचाल करा. या वयात हाडांचा ठिसूळपणा वाढलेला असतो. ओल्या फरशीवरुन, बाथरूममध्ये, जिन्यावरुन पडले तर मणक्यांना, खुब्यामधे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शस्त्रक्रिया/ अतिदक्षता विभागात उपचाराची गरज पडू शकते. सध्याच्या कठीण काळात सर्वच बाबींचा विचार केला, तर हे सर्व करताना नातेवाईकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे.

आजच्या परिस्थितीमध्ये काही कामांना, घरकामांना मदतनीस नाहीत, त्यामुळे काही कामांची सवय नसल्याने मानेच्या, कमरेच्या मणक्यांना, गुडघ्याला इजा होत आहेत. अशी दुखणी अंगावर काढू नयेत, त्यामुळे इजा व आजार वाढू शकतो, त्यासाठी कोणतीही शाररिक कामं करताना सावधगिरी बाळगणे हाच त्यावरील एकमेव पर्याय आहे. काही दुखापत झाली तर अस्थिरोग तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. कोरोना साथीमुळे बरेच गैरसमज पसरल्यामुळे नागरिक उपचारासाठी रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी घाबरत आहेत. पण खरतरं इतर ठिकाणांपेक्षा रुग्णालये स्वच्छतेच्या दृष्टीने सुरक्षित आहेत. रुग्णालयांमधे निर्जंतुकीकरणासाठी वेगळे कर्मचारी नेमलेले असतात, सॅनिटायजरचा वापर, मास्क वापरण्याची सक्ती, फिजिकल डिस्टंसिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. त्यामुळे काही दुखापत झाली, संधीवात किंवा मणक्याचे विकार असतील, तर निश्चिंतपणे आपल्या नेहमीच्या किंवा जवळ्च्या अस्थिरोग तज्ञांची वेळ घेऊन भेटा आणि वेळेवर उपचार घेणे गरजेचे आहे.

सर्व आजारांशी सामना करण्यासाठी सकस चौरस आहार, व्यायाम आणि विश्रांती आवश्यक आहे. अस्थि, मज्जा, स्नायू यांच्या बळकटीसाठी प्रथिने, काही खनिजतत्तवे, जीवनसत्वं योग्य प्रमाणात गरजेचे आहेत त्यामध्ये विशेष करून ‘ड’ व ‘ब’ जीवनसत्वाचे सर्व घटक फार महत्त्वाचे आहेत. पुष्कळ रूग्णांमधे यांची कमतरता असते. रोजच्या आहारातून मिळेल असा आहार आणि या जीवनसत्वांची औषधं तज्ञांचा सल्ल्याने नियमित घेणे गरजेचे आहे. याबरोबरच मधुमेह, हृदयरोग, थायरॉईड आजार असणाऱ्यांनी नेहमीची औषधं नियमीत सुरू ठेवावीत. नियमित तपासण्या करून घ्याव्यात. याबरोबरच नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे उद्याने, मैदाने, जिमखाने बंद आहेत, त्यामुळे आपल्या घराजवळंच, इमारतीत फिजिकल डिस्टंसिंगचे व इतर नियम पाळून व्यायाम करावा आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करावा. काही त्रास झालाच तर तातडीने डॉक्टरांचा मार्गदर्शन घेऊन उपचार करून घ्यावेत. नियमित आहार विहार केला तर गुंतागुंतीचे उपचार आणि त्यातून होणारी शाररिक आणि मानसिक हानी टाळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.