Pune ; चालत्या बोलत्या रुग्णावर कोरोना करतोय ‘झोल’ – हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चालता बोलता पेशंट दवाखान्यात गेला आणि अचानक सिरिअस कसा झाला? खूप जणांना हा प्रश्न भेडसावतो. रुग्णालयात रुग्ण झाला तेव्हा चांगला बोलत होता आणि मग लगेच सिरीयस कसा होईल ? नक्की काहीतरी झोल आहे. झोल तर आहेच.. आणि तो झोल केलाय कोरोना महामारीनेने. याविषयी हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ यांनी समज-गैरसमजाविषयी संवाद साधला आहे.

डॉ. मंगेश वाघ म्हणाले की, कोरोनाला आपण सर्व फ्लू सारखी सर्दी समजून बसलो. कोरोना तर निघाला महाबिलंदर. कोरोना शरीरातील फुफ्फुस तर बाधित करतोच. त्यामुळे फुफ्फुसामध्ये न्युमोनिया होतो आणि रक्तामधील ऑक्सिजन कमीकमी होऊ लागते. मात्र, कोरोनामुळे इतर बरेच अवयवदेखील बाधित झालेले असतात. त्यामुळे रक्तामध्ये ऑक्सिजन ९०, ८५, ८०, अगदी ७० झाले तरी कधीकधी रुग्ण शांत असतो. रुग्ण म्हणतो, “थोडे चालले तरच धाप लागते. नाहीतर सर्व काही ठीक आहे.. कशाला नेता दवाखान्यात? मी घरीच ठीक आहे.” आपण म्हणतो धाप आहे, विश्रांती घेतली की बरे वाटेल. लगेच दवाखान्यात जायची गरज नाही. शिवाय दवाखान्यात बेड शिल्लक नाहीत, अनेकांच्या हातापाया पडा, त्यापेक्षा घरी आराम करू आणि नंतर बघू असे आपण ठरवून टाकतो. मात्र, हीच सर्वात मोठी चूक होते. कारण शरीराला तर ऑक्सिजनची गरज असते.

कोरोना नसता तर, ऑक्सिजन ९३-९० च्या खाली गेले की लगेच अस्वस्थपणा, धडधड, गोंधळल्याची स्थिती आणि धाप लागणे सुरु झाले असते. पण कोरोना मेंदूमधील आणि महाधमणीतील सेन्सर्सच्या कामामध्ये बिघाड घडवून मेंदूला समजूच देत नाही, की रक्तातील ऑक्सिजन कमी झाले. म्हणून रुग्ण स्वतःला एकदम नॉर्मल समजत रहातो. यालाचा हॅपी हायपोक्सिया, सायलेंट हायपोक्सिया म्हणजे नकळत होणारी / लपलेली ऑक्सिजनची कमतरता असे म्हणतात. लपलेली असली तरी ऑक्सिजनची कमतरता (हायपोक्झिया) शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम करतच असते. काही काळाने अचानक रुग्णाला अतिशय धाप लागते आणि विविध अवयवांचे काम कमी होऊ लागते.

म्हणजे अचानक किडनी काम करेनाशी होते, कोणाला हृदयाला त्रास होतो. ऑर्गन शट डाऊन आणि असे दवाखान्यात दाखल केल्यानंतर झाले की आपण म्हणतो चालत गेलेला रुग्ण कसा सिरीयस झाला… रुग्ण सिरीयसच होता, कारण रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण बराच काळासाठी ९३ हून कमी होते. फक्त त्याची माहिती रुग्ण आणि आपल्यालाही समजत नाही. म्हणून जेव्हा कोविड सदृश्य लक्षण सुरु होतात, तेव्हा लगेच दिवसातून ४ वेळा पल्स-ऑक्सिमीटर वापरून एसपीओटू मोजणे आवश्यक आहे. आणि ते लिहून देखील ठेवायला हवे. एवढेच नाही तर ६ मिनिटे चालण्याची टेस्ट दिवसातून २ वेळा करायला केली पाहिजे. त्यामुळे लपलेली ऑक्सिजनची कमतरता देखील लगेच समजेल आणि शरीरातील अवयवांचे नुकसान होण्यापूर्वीच आपण रुग्णाला ऑक्सिजनसाठी रुग्णालयामध्ये दाखल करू शकू. त्यामुळे रुग्ण घरी असेल तेव्हा नियमित पणे एसपीओटूची नोंद, दररोज दोन वेळा ६ मिनिटे चालण्याची टेस्ट आणि पोटावर पालथे झोपून दीर्घ श्वास घेणे (प्रोनिंग) आवश्यक आहे.

रुग्ण कितीही नॉर्मल वाटत असला तरी एसपीओटू ९३ च्या खाली आले किंवा ६ मिनिटे चालल्यावर एसपीओटू ३ हून अधिकने कमी झाले तर रुग्णाला घरी न ठेवता लवकर दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेणे हिताचे आहे. सहव्याधी असतील तर अधिक लक्ष ठेवायला हवे. लवकर ऑक्सिजन मिळाला की मृत्यूचा धोका कमी होतो. नकळत होणाऱ्या ऑक्सिजनच्या कमतरतेवर आपणच पहारा ठेवला आणि पहिल्या टप्प्यामध्ये ओळखले तर रुग्ण दवाखान्यातून सुखरूप घरी येतो. हॅपी हायपोक्झिया ओळखू या, करोनावर मात करु या, असे त्यांनी स्पष्ट केले.