पुणे : ‘कोरोना’ पॉझिटिव्ह महिलेनं दिला जुळ्यांना जन्म

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक सुखद बातमी समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेने महापालिकेच्या रुग्णालयात दोन गोंडस जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. तसेच त्यांनी महिलेची प्रसुती करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाचे पुणेकरांच्या वतीने अभिनंदन करत आभार मानले आहेत.

पुण्यातील सर्वच पेठांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. भवानी पेठेत राहणाऱ्या एका महिलेला महापालिकेच्या सोनवणे हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने डॉक्टारांनी महिलेची विशेष काळजी घेतली. या महिलेने दोन गोंडस जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. बाळ, बाळंतीन असे तिघेही सुखरूप असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे महापौरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

विशेष म्हणजे कोरोना उद्रेकाच्या परिस्थितीत योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रसूती केल्याने आई आणि दोन्ही मुलांना कोणताही धोका नाही. यशस्वी प्रसूती करणाऱ्या डॉ. रोकडे, डॉ. चोपडे, डॉ. अग्रवाल, डॉ. आरती, डॉ. अनिता भोसले, डॉ. सृजन आणि एस.एन. चौरे यांचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी अभिनंदन केले आहे. तसेच पुणेकरांच्या वतीने आभार मानले आहेत.
काय आहे पुण्यातील कोरोनाची स्थिती ?

गुरुवारी पुणे शहरामध्ये 1699 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली होती. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 53437 झाली आहे. तर 1315 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या पुणे शहरामध्ये 18215 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.