पुण्यातही लॉकडाऊन ? मनपा आयुक्तांनी केला खुलासा, जाणून घ्या काय सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई आणि उपनगर भागात कोरोना संक्रमणाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नवी मुंबई, ठाणे पाठोपाठ पुणे शहरात देखील गेल्या 24 तासात कोरोना संक्रमित रुग्णांची सर्वाधिक प्रकरणं समोर आली आहेत. पुणे महापालिकेने कंटेन्मेंट झोनमध्येही वाढ केल्याचे जाहीर केले आहे. आता मुंबई बाहेरच्या उपनगरांप्रमाणेच पुण्यात देखील लॉकडाऊन होणार अशी चर्चा सुरु आहे. मात्र, याबाबत पुणे महापालिका आयुक्तांनी याबाबत खुलासा केला आहे.

नवी मुंबई, ठाणे, पनवेल, मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली या मुंबईच्या उपनगरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महापालिकांनी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या शहरातील लोकांना अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या शहरांप्रमाणे पुणे शहरात देखील कडक लॉकडाऊन होणार का याविषयी चर्चा सुरु झाल्या आहेत.

पुण्यात सुरु असलेल्या लॉकडाऊन विषयीच्या चर्चांवर बोलताना महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, पुण्यात कोव्हिड-19 चा उद्रेक होण्याची शक्यता आहे, कारण पुण्यात चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. पण तुर्तास लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. उलट लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांनी विनाकारण बेड्स अडवून ठेवू नयेत, असंही आवाहन आयुक्तांनी केले आहे.

जुलै अखेर 40 हजारांचा टप्पा ओलांडू

पुण्यात टेस्टिंग वाढवल्याने जुलै महिन्याअखेर कोरोना बाधितांचा आकडा 40 हजारांचा टप्पा ओलांडू शकतो आणि त्यापैकी 18000 रुग्णांना हॉस्पिटल किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असा अंदाज आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. पालिकेकडे तज्ज्ञ डॉक्टर नाहीत, पण व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. हे व्हेंटिलेटर्स ससून हॉस्पिटलला सुपूर्त करण्यात येणार आहेत. कारण ससूनला सध्या व्हेंटिलेटर्सची आवश्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like