Coronavirus : पुण्यात रेड झोन वगळता इतर परिसरातील व्यवहार पूर्ववत होणार, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले संकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-  शहरातील ज्या वस्त्या आणि वसाहती मध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत, अशा रेड झोन मधील वसाहती वगळता अन्य परिसरातील व्यवहार 3 मे नंतर पूर्ववत सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशनुसारच ही तयारी करण्यात येत असून येत्या एक दोन दिवसांत शासनाकडून गाईड लाईन्स आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. यामुळे येत्या तीन तारखेनंतर शहरातील बहुतांश परीसरातील व्यवहार हळूहळू सुरू होतील असे संकेत मिळत आहेत.

शहरात 9 मार्चला कोरोना बाधित पहिला रुग्ण सापडल्यानंतर आजपर्यंत ही संख्या 1 हजाराच्या पुढे गेली आहे. तर 81 जणांचे बळीही गेले आहेत. मागील दहा दिवसांत कोरोनाची बाधा झालेले आणि मृतांची संख्या भयानक रित्या वाढू लागल्याने शहरातील मध्यवर्ती पेठांसह , येरवडा, धानोरी, विश्रांतवाडी, वानवडी, कोंढवा, पर्वती दर्शन, शिवाजीनगर परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात मोठया प्रमाणावर चाचण्या करण्यात येत आहेत. परंतु परिसर सील केल्यानंतरही या परिसरातील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे. पुण्यातील कोरोना बाधित आणि मृतांची संख्या वाढत असल्याने केंद्र शासनाने पुणे शहर आणि काही तालुके रेड झोन म्हणून जाहीर केले आहेत. या सोबतच या परिसरातील लोकांचे मोठ्याप्रमाणात स्क्रिनिंग करून त्यांना विलगीकरण कशात ठेवण्यात येत आहे.

परंतु सलग 40 दिवसांच्या लोकडावूनमुळे सर्व अर्थचक्र थांबले असून नागरिकांचा संयम ही सुटत चालला आहे. दरम्यान केंद्र व राज्य शासनाने ग्रीन झोन, orange झोन मध्ये हळूहळू व्यवहार सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. यामध्ये ठिकठिकाणी अडकून पडलेले मजूर, विद्यार्थी यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी काही अटींवर परवानगी दिली असून माल वाहतूक आणि औदयोगिक वाहतुकिला ही परवानगी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील व्यवहारही सुरू करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आल्याचे पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, की आतापर्यंत कोरोना चे रुग्णांचे वॉर्ड स्तरीय मोजमाप करण्यात येत होते. शहरातील 15 पैकी पाच वॉर्ड ऑफिस च्या हद्दीमध्ये 100 हुन अधिक रुग्ण सापडल्याने तो रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. परंतु यापुढे जाऊन आता या वॉर्ड ऑफिस च्या अंतर्गत ज्या वस्त्या अथवा वसाहतीमध्ये रुग्णांची अधिक संख्या आहे, तेवढाच परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून पाहण्यात येईल. उर्वरीत परिसर त्यातून वगळण्यात येईल. कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांचे विलगिकरण, तपासण्या यावर भर राहील. त्या परिसरात संचारबंदीचे निर्बंध कायम ठेवण्यात येतील. व उर्वरित परिसरातील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात येतील, त्या दृष्टीने नियोजन तयार करण्यात आले आहे.

लॉक डाऊन 3 मे ला संपत आहे. केंद्र आणि राज्य शासन पुढील कालावधीसाठी गाईड लाईन्स देणार आहेत. त्यानुसार अंतिम नियोजन करून अंमलबजावणी करण्यात येईल, असे गायकवाड यांनी नमूद केले.
शहरात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण आढल्यानंतर महापालिका सतर्क झाली. हळूहळू देशभरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. यामुळे राज्य शासनाने सर्वप्रथम उद्याने, चित्रपट गृह, जलतरण तलाव, मैदाने , शाळा, महाविद्यालय अशी गर्दीची ठिकाणे बंद केली. यापाठोपाठ राज्य शासनाने शासकीय कार्यलयातील कर्मचारी संख्याही अवघ्या पाच टक्क्यांवर आणली. तर 22 मार्चरोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता curfew च्या माध्यमातून लॉक डाऊन ची चाचणी घेतली. या पाठोपाठ 23 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉक डावूनची घोषणा केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला रात्री 25 मार्च पासून संपूर्ण देश 21 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन ची घोषणा केली. रुग्ण वाढू लागल्याने हा कालावधी 3 मे पर्यंत वाढविला आहे.