‘कोरोना’मुळं नातीगोती तोडू नका ! शहरात राहणारे शत्रू नव्हेत, तुमच्या रक्ताच्या नात्यातील आहेत

पुणे : कोरोना व्हायरसचे संकट जाईल आणि त्यानंतर पुन्हा सर्वकाही सुरळीत होईल. शहरवासिय तुमच्याच रक्ताच्या नात्यातील आहेत. आता त्यांना दुखावू नका, वेळ बदलेल आणि पुन्हा पश्चाताप होईल, असे वागू नका. कोरोनाचे संकट कायमस्वरूपी नाही. शहरवासिय तुमचे शत्रू नाहीत. तुमचीच मुले शहरात चांगले शिक्षण घेण्यासाठी जाणार आहेत, हे विसरून चालणार नाही. चांगले उपचार पाहिजेत, चांगले शिक्षण पाहिजे, तर शहराकडे धाव घेता. मग त्यांना उद्या बंदी घातली तर तुम्ही त्यांना नावे ठेवणार का, असा सवालही सूज्ञ मंडळींनी उपस्थित केला आहे.

कोरोनाच्या धास्तीमुळे यावर्षी यात्रा-उत्सव, लग्नसमारंभ आणि इतरही कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे गावाकडील मंडळी शहरवासियांना गावाकडे येऊ नका, असा संदेश देत आहेत. कोरोनाची भीती आहे, गावपातळीवरील समित्या आम्हाला त्रास देत आहेत, असेही सांगितले जात आहे.

आतापर्यंत अडचणीच्या वेळी पुणे-मुंबईसह शहरवासिय तुम्हाला हवे होते. आता त्यांना शहरामध्ये काहीशी अडचण येत आहे, तर त्यांचा तिटकारा वाटू लगला का, अशी विचारणा काहींनी केली आहे. बाबांनो संकट येते आणि काही तरी शिकवून जाते, तसे कोरोना बरेच काही शिकवून जात आहे, हे विसरू नका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही अशी व्याख्या लोकशाहीची केली आहे. त्याप्रमाणे माणसाने एकमेकाला आधार देणे हीच खरी माणुसकी असते, असे आम्ही घसा कोरडा होईपर्यंत सांगतो. मग आता कुठे गेला तुमचा माणुसकीचा धर्म असा संतप्त सवालही काही चाकरमान्यांनी केला आहे.

मुंबई, पुणे या शहरांतून मागिल दीड-दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाकडे कूच करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात चांगलाच पेच वाढला आहे. अनेक चाकरमान्यांना त्यांचा मूळगावी एंट्री मिळत नसल्याने थेट ‘वशिला’ लावून तडक सासुरवाडी गाठत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी, दरवर्षी शहरवासिय उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये कुटुंबीयांसह येत असतात. शाळांना सुट्टी असल्यामुळे घरातले लग्न, समारंभ, इतरही छोटेमोठे कार्यक्रम, तसेच यात्रा उत्सवानिमित्त ही मंडळी गावाकडे येतात.

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी 22 मार्चपासून आतापर्यंत चारवेळा लॉकडाऊन केले. मात्र, तिसऱ्या आणि चौथ्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली गेली. त्यामुळे शहरवासियांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, स्वत:च्या गावात प्रवेश करणे अवघड होत असल्याने अनेकांनी सासुरवाडी गाठली असून सासरेबुवा राजकीय वजन वापरून त्यांना क्वॉरंटाइन न ठेवता घरी ठेवून घेण्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई येथून येणाऱ्या जावयांची अन्य गावकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

शहरातून येणाऱ्या व्यक्तींना क्वॉरंटाइन करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी गावपातळीवर समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याचे दिसत असून, पुण्या-मुंबईतून आलेल्या नातेवाईकांना क्वॉरंटाइन न करता पाहुण्यांच्या घरी राहण्याची मुभा दिली असल्याची कुजबूज सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकींच्या राजकारणाचे त्यामागे कारण असल्याचेही गावकरी सांगतात.

पुणे-मुंबई शहरामध्ये बहुतांश गावातील नातेवाईक असून, ते दरवर्षी उन्हाळ्याच्या सुटीमध्ये लग्न समारंभ, जत्रा, यात्रा, उत्सव या निमित्त येत असतात. यावर्षी कोरोनामुळे त्यांना गावी येण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यनंतर त्यांनी गावचा रस्ता धरला आहे. दरम्यान, यावर्षी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गावोगावी ग्रामसुरक्षा समित्या स्थापन केल्या आहेत. कोरोना हॉटस्पॉटमधून आलेल्या नातेवाईंकांची तापसणी करून गरजेनुसार त्यांना गावातील शाळेत क्वॉरंटाइन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, राजकीय वजन असलेल्या ग्रामस्थांच्या नातेवाईकांना यातून सूट दिली जात आहे. त्यातच बाहेरून आलेल्या नातेवाईकांमुळे काही गावांत करोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना आढळून आल्याने गावात येणाऱ्या अशा नातेवाईकांची धास्ती घेण्यात येत आहे.