Coronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका वाढला ! गेल्या 24 तासात 634 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कठोर पावलं उचलण्यात येत आहेत. पुणे शहरात रविवारी (दि.20) 634 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 294 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4 हजार 707 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 164 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर 350 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आज दिवसभरात पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 826 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 896 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 97 हजार 964 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 90 हजार 242 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अचानक वाढल्याने सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे जिल्ह्यात फैलाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.