Coronavirus : पुण्यात कोरोनाचा धोका वाढला ! गेल्या 24 तासात 774 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 2 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल काही दिवसांपासून पुण्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कठोर पावलं उचलण्यात येत आहेत. पुणे शहरात रविवारी (दि.28) 774 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 427 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7 हजार 473 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 261 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर 545 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आज दिवसभरात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 855 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 4 हजार 919 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 2 लाख 2 हजार 702 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 92 हजार 928 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 6 हजार 453 रुग्णांपैकी 3 लाख 87 हजार 527 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण 9 हजार 783 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 143 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.25 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.34 टक्के आहे.