Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 4587 नवीन रुग्ण, 6473 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा उद्रेक पहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असून, मत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, आज (सोमवार) काहीसा दिलासा मिळाला आहे. पुण्यामध्ये गेल्या 24 तासांत 4 हजार 587 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 473 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे महापालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात शहरामध्ये 20 हजार 889 स्वॅब नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 4587 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 71 हजार 824 इतकी झाली आहे. शहरात रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आज दिवसभरात कोरोनामुळे 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 54 रुग्ण शहरातील तर 22 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे 6 हजार 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या वाढत असताना शहरामध्ये अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहरामध्ये 54 हजार 696 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्यापैकी 1297 क्रिटिकल असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 6473 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 3 लाख 10 हजार 965 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.