Coronavirus in Pune : थोडा दिलासा ! पुण्यात गेल्या 24 तासात 5138 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6802 जणांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून पाच हजारांच्यावर आढळून येत आहेत. रुग्ण संख्या वाढत असताना मृत्यूंची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात 5 हजार 138 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 802 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 76 हजार 962 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 55 रुग्ण शहरातील आहेत तर 20 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 6 हजार 218 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 6 हजार 802 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 17 हजार 767 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (मंगळवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 20 हजार 204 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 52 हजार 977 इतकी आहे. यापैकी 1277 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 7 लाख 32 हजार 058 रुग्णांपैकी 6 लाख 18 हजार 163 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 2 हजार 452 एवढी झाली आहे. तर जिल्ह्यात कोरोनाबाधित 11 हजार 443 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 84.44 टक्के आहे.