Coronavirus in Pune : पुण्यात ‘कोरोना’चे 4539 नवीन रुग्ण, 4851 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असून राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असून आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पुणे शहरात रुग्ण वाढत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. दरम्यान पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात 4 हजार 539 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 851 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 87 हजार 030 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 56 रुग्ण शहरातील आहेत तर 24 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 6 हजार 330 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 3 लाख 29 हजार 148 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (गुरुवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 22 हजार 277 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 51 हजार 552 इतकी आहे. त्यापैकी 1313 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 7 लाख 53 हजार 353 रुग्णांपैकी 6 लाख 40 हजार 379 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 12 हजार 099 एवढी झाली आहे. तर जिल्ह्यात कोरोनाबाधित 11 हजार 675 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 85.00 टक्के आहे.