Coronavirus in Pune : पुण्यात ‘कोरोना’च्या नवीन रुग्णसंख्येत घट ! मात्र, 82 रुग्णांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या संख्येत घट होत असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने दिलासा मिळत आहे. पुणे जिल्ह्यात देखील एप्रिलमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. मात्र, आता नवीन रुग्णसंख्येत घट होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, रुग्णसंख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंता कायम आहे. पुण्यामध्ये गेल्या 24 तासत 2 हजार 879 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 82 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 33 हजार 089 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 63 रुग्ण शहरातील आहेत तर 19 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 054 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 3 हजार 678 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजपर्यंत 3 लाख 86 हजार 196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 15 हजार 098 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 39 हजार 839 इतकी आहे. त्यापैकी 1413 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 68 हजार 506 रुग्णांपैकी 7 लाख 57 हजार 820 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 97 हजार 232 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 हजार 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.26 टक्के आहे.