Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 2892 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना पहायला मिळत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना पुणे शहरात देखील रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 021 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 892 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 61 हजार 008 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 46 रुग्ण शहरातील आहेत तर 22 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 975 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 2 हजार 892 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 36 हजार 690 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 9 हजार 258 स्वॅब तपासणी करण्यात आली. आजपर्यंत शहरात 23 लाख 81 हजार 292 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 16 हजार 523 इतकी आहे. यापैकी 1364 रुग्ण गंभीर आहे. तर 5010 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 72 हजार 688 रुग्णांपैकी 8 लाख 86 हजार 318 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 71 हजार 21 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.58 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91.12 टक्के आहे.