Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1076 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये मागील काही महिन्यापासून कोरोना व्हयरसने थैमान घातले होते. पुणे शहरातील रुग्णांची संख्या वेगाने वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला होता. पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तसेच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासात 931 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 63 हजार 103 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 42 रुग्ण शहरातील आहेत तर 24 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 7 हजार 887 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 1 हजार 076 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 40 हजार 173 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 12 हजार 226 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 15 हजार 043 इतकी आहे. यापैकी 1328 रुग्ण गंभीर आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 80 हजार 986 रुग्णांपैकी 9 लाख 409 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 65 हजार 6 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 571 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.59 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91.79 टक्के आहे.