Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1158 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव कमी होत आहे. शहरी भागातील कोरोनाची स्थिती सुधारत असताना ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. असे असताना मागील अनेक दिवसांपासून पुणे शहरात वाढत असणारी रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्यामध्ये गेल्या 24 तासात 683 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 67 हजार 571 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 27 रुग्ण शहरातील आहेत तर 10 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 115 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 1 हजार 158 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 4 लाख 51 हजार 070 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8 हजार 751 स्वॅब तपासणी करण्यात आली. आतापर्यंत शहरामध्ये 24 लाख 60 हजार 516 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 8 हजार 356 इतकी आहे. यापैकी 1020 रुग्ण गंभीर आहे. तर 2124 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 330 रुग्णांपैकी 9 लाख 45 हजार 974 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 38 हजार 100 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 256 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.63 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.57 टक्के आहे.