Coronavirus : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 2022 जण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – राज्यातील काही ग्रामीण भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं समोर येणार्‍या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे काही ठिकाणी कोरोनाचे रूग्ण मोठया प्रमाणावर बरे होत असल्याचे चित्र असून ती मोठी समाधानाची बाब आहे. पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 2022 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरात 2022 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात कोरोनाचे 1880 नवे पॉझिटिव्ह देखील समोर आली आहेत. पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनामुळं 35 जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील 13 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळं आता पुण्यात कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या 2584 वर जावून पोहचली आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 9 हजार 838 वर गेली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 90 हजार 601 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 16653 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 912 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 480 रूग्णांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.