Coronavirus News : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 102 नवे पॉझिटिव्ह तर 236 जणांचा डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शहरात सोमवारी (दि.1) 102 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर 236 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (सोमवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 2 हजार 431 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 156 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज दिवसभरात 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 766 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 808 इतकी आहे. शहरात आजपर्यंत 1 लाख 86 हजार 024 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 1 लाख 79 हजार 450 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 79 हजार 357 रुग्णांपैकी 3 लाख 65 हजार 158 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 232 आहे. यामध्ये 4 स्ट्रेन या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 967 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.26 टक्के आहे.