Coronavirus : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1961 जण झाले ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतोय हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, कोरोनाचे रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात देखील लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 1961 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात 1290 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर पुणे शहरातील 37 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहराबाहेरील 13 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या 1516 झाली आहे.

पुणे शहरात सध्या एकुण 64576 कोरोनाबाधित आहेत. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 46735 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 16325 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 717 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यापैकी 443 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. कोरोनातून रूग्ण बरे होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली असली तरी कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह देखील समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावं तसेच सोशल डिस्टेन्सिंगचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.