Pune : मनपा प्रशासनानं अवघ्या 15 दिवसांत उभारलं 270 ऑक्सीजन आणि 44 ICU बेडचं कोविड हॉस्पीटल, लवकरच ‘लोकार्पण’

पुणे – कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी बेडची गरज भासत असताना महापालिकेने अवघ्या काही दिवसांत बाणेर येथील स.नं. १०९ मध्ये ऍकोमोडेशन रिझर्वेशन अंतर्गत ताब्यात आलेल्या सुमारे सव्वाचार हजार चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या सहा मजली इमारतीत सीएसआरच्या माध्यमातून अल्पावधीत ३१४ बेडस्चे रुग्णालय उभारले आहे. सीओईपी येथे उभारण्यात येणार्‍या जंबो हॉस्पीटलच्या तुलनेत हे हॉस्पीटल चालविण्यासाठी प्रतिबेड कमी खर्च होणार असून पुढील एक ते दीड वर्ष याचा वापर करता येणार असल्याची माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या हॉस्पीटलमध्ये डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ तसेच रुग्णांना देण्यात येणार्‍या सुविधांचे काम भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल ऍन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटला देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. वाघमारे यांनी सांगितले, की शहरातील वाढती रुग्णसंख्या तसेच ऑक्सीजन व व्हेंटीलेटरची सुविधा असलेल्या बेडस्ची कमतरता असल्याने अनेक रुग्ण व त्यांच्या नातेवाईंकांना मनस्ताप होत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या मिळकतींमध्येही कोवीड सेंटर सुरू करण्याचा विचार सुरू होता. नुकतेच बाणेर येथील सुमारे सव्वाचार चौ.मी. क्षेत्रफळ असलेली सहा मजली इमारत ऍकोमोडेशन रिझर्व्हेशन अंतर्गत महापालिकेच्या ताब्यात आली आहे. या इमारतीमध्ये कोव्हीड हॉस्पीटल सुरू करण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष व पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली. या इमारतीमध्ये सीएसआरच्या माध्यमातून उपचारांसाठी अद्ययावत सामुग्री तसेच बेडस्ची सुविधा देण्याबाबत पंचशील फाउंडेशन, एबीआयएल फाउंडेशन, माईंडस्पेस बिझनेस पार्क प्रा.लि., मालपाणी ग्रुप संगमनेर आणि गेरा डेव्हलपमेंट प्रा. लि. यांनी सहकार्य देण्याची तयारी दर्शविल्यानंतर तातडीने हॉस्पीटल उभारणीच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.

या इमारतीमध्ये २७० ऑक्सीजन बेडस् व ४४ आयसीयू बेडस् करण्यात आले आहेत. प्रत्येक बेडपर्यंत ऑक्सीजन पुरवठा, आयसीयू युनिटसाठी एससी, सिलिंग पडदे, उपकरणांसाठी वीज जोडणी, पार्टीशन्स, पंखे तसेच १३००० लि. क्षमतेचा लिक्विड ऑक्सीजन टँक बसविण्यात आला आहे. यासोबतच बॅकअपसाठी ऑक्सीजन सिलिंडर, मॅनिफोल्ड, कॉंम्प्रेसर व व्हॅक्युम पंप, बॅकअप साठी युपीएस व जनरेटर सुविधा, व्हेंटीलेटर्स, ईसीज मशिन, खाटा, गाद्या, बेडशिटस् आणि सीसीसी टीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे हॉस्पीटलचे लोकार्पण करण्यात येईल, असे प्रशांत वाघमारे यांनी नमूद केले.