Pune Corporation | कचरा संकलनासाठी नागपूर मनपाने नेमलेल्या कंपन्यांचे कर्मचारी, अधिकार्‍यांची ‘अरेरावी’; पुणे मनपातील सत्ताधारी ‘खाजगी कंपन्या’ नेमणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेली अनेकवर्ष शहरात घरोघरी जावून कचरा गोळा करणार्‍या कष्टकरी महिलांच्या ‘स्वच्छ संस्थेचे’ काम काढून घेउन खाजगी कंपनीला देण्याचा पुणे महापालिकेतील (Pune Corporation) सत्ताधारी भाजपच्या काही पदाधिकार्‍यांचा प्रयत्न सुरू आहे. परंतू भाजपचीच सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेमध्ये (Nagpur) याच कामासाठी नेमलेल्या ‘एजी एन्व्हायरो’ (AG Enviro) आणि ‘बीव्हीजी’ (BVG) या कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले असून ते सामान्य नागरिकांचे तर सोडा पण नगरसेवकांचेही फोन उचलत नसल्याने ‘चौकशी’ समिती गठित केली. नागपूरमध्ये ‘दुधाने’ तोंड पोळत असताना भाजप पुणे महापालिकेत (Pune Corporation) त्याचीच पुनरावृत्ती करणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पुणे शहरामध्ये मागील अनेक वर्षांपासून घरोघरी जावून ओला व सुका कचरा गोळा केला जातो. शहरातील बहुतांश भागात कष्टकरी महिलांच्या ‘स्वच्छ संस्थेच्या’वतीने ही सेवा देण्यात येत आहे. परंतू या संस्थेला बाजूला सारून ‘बीव्हीजी’ सारख्या कंपन्यांना कचरा गोळा करण्याचे काम देण्यासाठी सत्ताधारी भाजप प्रयत्नशील आहे. स्वच्छ संस्थेचा करार संपल्यानंतरही ऐन कोरोना काळात या संस्थेच्या पाच हजारांहून अधिक कचरावेचकांनी त्यांचे काम इमाने इतबारे सुरू ठेवले आहे. परंतू या संस्थेसोबत नव्याने कुठलाही करार न करता तसेच नवीन कंपनीच्या नेमणुकीची प्रक्रियाही सुरू न करता केवळ स्वच्छ संस्थेच्या कामाला स्थायी समितीमध्ये एक-दोन महिने मुदतवाढ देण्यात येत आहे.

काम जाण्याच्या भितीने हातावर पोट असलेल्या कष्टकरी महिला या परिस्थितीत दडपणाखाली काम करत आहेत. तसेच संस्थेच्यावतीने गेल्या काही महिन्यांत काळ्या फित लावून तसेच महापालिका भवनसमोर आंदोलनेही करण्यात आली आहेत. विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपमधील काही पदाधिकार्‍यांनीही स्वच्छ संस्थेकडेच काम राहील अशी जाहीर भुमिका घेतली असली तरी स्थायी समितीने याबाबत अद्याप निर्णय न घेतल्याने ‘घोडे अडले ’ आहे.

दरम्यान, नागपूर महापालिकेतही (Nagpur Corporation) भाजपचीच सत्ता आहे.
तेथे शहरातील कचरा संकलन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या कंपनीकडे सोपविली आहे.
या कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांशी अरेरावी करतात.
नागरिकच नव्हे तर नगरसेवकांचेही फोन उचलत नाहीत अशी तक्रार विरोधी पक्षनेते तानाजी वनवे
यांनी केल्यानंतर तेथील सभागृह नेते अविनाश ठाकरे
यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीच्या बैठकीमध्ये एका गटनेत्याने कंपनीच्या कचरा वाहतूक ट्रकमध्ये कचर्‍यापेक्षा मातीच असल्याचा व्हिडीओसह निदर्शनास आणून दिले.
तसेच अन्य नगरसेवकांनीही तक्रारींचा पाढाच वाचला आहे.
समिती याप्रकरणी आणखी चौकशी करून अंतिम अहवाल ठेवणार आहे.

नागपूरमध्ये खाजगी कंपन्यांच्या कामाबद्दल अशा तक्रारी असताना पुणे महापालिकेतील (Pune Corporation) सत्ताधारी गेल्या अनेक वर्षांपासून सुरळीत असलेले कचरा संकलनाचे काम ‘खाजगी कंपन्यांच्या ’ घशात घालणार का? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Web Title :- Pune Corporation | ‘Areravi’ of employees and officials of companies appointed by Nagpur Municipal Corporation for waste collection; Pune will appoint ‘private companies’!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS Officer । ‘संत मीराबाईप्रमाणे कृष्णभक्तीत तल्लीन व्हायचंय’, स्वेच्छानिवृत्तीसाठी महिला IPS अधिकाऱ्याचे DGP ला पत्र

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी