पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी रुबेल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शितल उगले-तेली यांची आज बदली करण्यात आली असून त्याबाबतचा आदेशही निघाला आहे. उगले यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला होता. त्यातून उगले यांची बदली झाल्याची चर्चा आहे. याआधी प्रेरणा देशभ्रतार यांचीही मुदतीपुर्वीच बदली करण्यात आली होती. उगले यांच्याजागी रुबल अग्रवाल यांची नियुक्ती होणार आहे.

शितल उगले यांची बदली नागपूर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. नागपूर शहराच्या विकासासाठी 1936 साली हे प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या शिवाय, उगले यांच्याकड सदस्य सचिव वैधानिक विकास महामंडळ या पदाचा अतिरिक्त पदभारही असणार आहे. महापालिका आयुक्तांची मान्यता घेऊन या दोन्ही पदांचा तातडीनं पदभार घ्यावा असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) डॉ. सिताराम कुंटे यांनी महापालिकेस पाठविलेल्या पत्रात देण्यात आले आहेत.
महापालिकेत अतिरिक्‍त आयुक्तपदी उगले यांची 11 मे 2017 ला नियुक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय शिस्त, बढती, तसेच निविदां प्रक्रियेतील गोंधळाला चाप लावला होता. त्यावरून सत्ताधारी भाजप पदाधिकारी आणि उगले यांच्यात वादाचे खटके उडत होते. अनेकदा त्याचे पडसाद मुख्यसभेतही उमटले होते.

उगले यांनी आपल्या 19 महिन्यांच्या कारकिर्दीत शिक्षण मंडळ तसेच पालिका कर्मचारी आणि समाज विकास योजनांचा लाभ थेट डीबीटी द्वारे देणे, शाळांच्या सुधारणांसाठी “बाला’ प्रकल्प, प्रकल्पांचा नियमित आढावा घेण्यासाठी प्रत्येक बुधवारी वॉर रूमची बैठक असे उपक्रम राबविले होते. तर, शहरातील स्वच्छतागृहे पाडण्याच्या प्रस्तावांना त्यांनी मनाई केल्याने महिला आणि बालकल्याण समिती मधील सदस्यांशी त्यांचे वादही झालेले होते. त्याचे पडसद अनेकदा महापालिकेच्या मुख्यसभेत उमटून नगरसेवकांनी थेट उगले यांना शासनाकडे पाठविण्याची मागणीही केली होती. त्यानंतर भाजपच्या सुमारे 80 हून नगरसेवकांनी त्यांच्या बदलीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवून बदलीची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती.