Pune : भाजप पदाधिकार्‍याच्या दबावाखाली आंबिल ओढ्यातील रिटेनिंग वॉलचे काम, अपात्र ठेकेदाराला देण्याचा घाट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या नेत्याच्या दबावाखाली आंबिल ओढ्यातील रिटेनिंग वॉलची निविदा ठेकेदार विकास पाटील यांच्या सावी कन्स्ट्रक्शनला मिळावी यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल हे देखिल दोषी आहेत. त्यांची चौकशी करावी. तसेच या निविदेला मान्यता दिल्यास त्याविरोधात राज्य शासन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

अरविंद शिंदे म्हणाले, की कल्व्हर्ट च्या निविदेत पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवलं, आणि अपात्र ठरलेल्या विकास पाटील यांच्या सावी कन्स्ट्रक्शनला पात्र ठरविण्यात आले. ही बाब उघड झाल्यानंतर निविदा रद्द करून त्याची चौकशी अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्याकडे देण्यात आली. या चौकशीमध्ये काय झाले याचा अहवाल न देताच आंबिल ओढ्यातील रिटेनिंग वॉलचे २० कोटी रुपयांचे कामही काम पाटील यांनाच देण्याचा घाट घातला आहे. या ठेकेदाराला सरकारी कामाचा अनुभव नाही. ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून एस्टीमेट केले जात आहे. हा ठेकेदार वापरत असलेले तंत्रज्ञान कोथरूडच्या आमदारांप्रमाणेच बाहेरून इंम्पोर्ट केले आहे. भाजपच्या एका पदाधिकार्‍याच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड भागात लागलेले फ्लेक्स याच ठेकेदाराने स्पॉन्सर केले असून यावर त्याचे ङ्गोटोही आहेत.

भाजपच्या या पदाधिकार्‍यो दमबाजी करून त्याच्या मर्जीतील ठेकेदारालाच काम मिळावे यासाठी प्रयत्न केल्याचे यातून दिसून येते. एस्टीमेट कमिटीच्यावेळी हा पदाधिकारीही ठेकेदारासोबत तेथे उपस्थित होता, असा आमचा आरोप आहे. त्यादिवसाचे सीसीटीव्ह फुटेज तपासावेत, असे आव्हानही अरविंद शिंदे यांनी दिले. कोरोनाच्या गडबडीत काही अधिकारी या प्रस्तावासाठीच प्रयत्नशील होते हे अनेक अभिप्राय एकाच दिवसात दिल्यावरून दिसून येतेय. कोरोनाकडे दुर्लक्ष करणार्‍या अशा अधिकार्‍यांमुळेच कोरोनाचे संकट वाढले आहे. अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही त्यांनी या ठेकेदाराला अनुकूल अशीच भूमिका घेतली आहे. तेच यामध्ये दोषी आहेत. शासनाने या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी नगरविकास विभागाकडे करणार असून लाच लुचपत विभागाकडे ही तक्रार करणार असल्याचे अरविंद शिंदे यांनी सांगितले.