Pune : कोंढाव्यात रुग्णाच्या मृत्युनंतर डॉक्टरांना केलेल्या मारहाणीत नगरसेवक व समर्थकांचा हात; CCTV फुटेजमधून निष्पन्न, हल्लेखोर फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही, ऑक्सिजनची कमतरता आहे, असे असताना बेड देऊ शकत नसल्याने पेशंटला आणू नका, असे स्पष्ट सांगितले असतानाही कोंढव्यातील एका नगरसेवकाने जबरदस्तीने अस्तव्यस्थ  पेशंटला कार्डियाक रुग्णवाहिकेतून मध्यरात्रीच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आणले. परंतु हॉस्पिटलच्या दारातच रुग्णवाहिकेमध्ये या रुग्णाचा मृत्यु झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णाची तपासणी करणारे डॉक्टर व हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केली. या घटनेला स्थानिक नगरसेवक व त्याचे समर्थक जबाबदार असून ते सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याचा आरोप हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आला आहे.

ही घटना कोंढव्यातील प्राईम हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी वैद्यकीय सेवा हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी, राष्ट्रीय आपत्ती कायदा तसेच साथ रोग प्रतिबंधक कायद्याखाली १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी डॉ. सिद्धांत तोतला (वय २५, रा. मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ‘पोलीसनामा’ला सांगितले की, कोंढव्यातील एका नगरसेवकाचा रात्री फोन आला होता. त्यांनी एक पेशंट असून त्यांना अ‍ॅडमिट करुन घ्या, असा दबाव आणला होता. त्यावेळी आपण त्यांना स्पष्ट सांगितले की, हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही. ऑक्सिजनची कमतरता आहे. तुम्ही ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करा, मगच पेशंटला घेऊन या. त्यानंतर त्यांनी आम्ही व्यवस्था करतो, असे सांगितले. त्यानंतर ते स्वत: व त्यांचे समर्थक पेशंटला घेऊन आले. पेशंटला हॉस्पिटलच्या आतही घेतले नव्हते. दारातच डॉक्टरांनी तपासले. तेव्हा पेशंटचा मृत्यु झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना बोलावले. त्यांनी तपासल्यावर पेशंटचा मृत्यु झाल्याचे सांगितले. त्यात हॉस्पिटलची कोणतीही चुक नसताना डॉक्टर व स्टाफला मारहाण करुन तोडफोड करण्यात आली. नगरसेवकाने आपल्या समर्थकांना आवर घालायला पाहिजे होता. त्यांचे समर्थक तोडफोड करत असताना ते ही सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत, त्या नगरसेवकांवर पोलीस गुन्हा दाखल करतील का असे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले.

कोंढवा येथील प्राईम हॉस्पिटलमध्ये डॉ. तोतला हे मध्यरात्री साडेबारा वाजता व्हिजिटला आले होते. त्यावेळी एका कार्डियाक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन आली होती. डॉ. तोतला यांनी त्याला तपासले. तेव्हा रुग्णाची नाडी लागत नव्हती. त्याचा मृत्यु झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना कळविले. डॉ. ताबीश व डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णाला तपासले. त्यांनी तेथे जमलेल्या १५ ते २० जणांना रुग्णाचा मृत्यु झाल्याचे सांगितले. हे समजल्यावर त्यांनी डॉ. तोतला यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपाने मारहाण केली. तसेच हॉस्पिटलमधील अकाऊंटंट इमाम हुल्लर यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. सुरक्षा रक्षकाच्या केबीनची काच फोडून नुकसान केले. हॉस्पिटलसमोरील दरवाजावर दगड फेकले. दरवाजासमोरील कुंडीमधील झाडे फेकून देऊन नुकसान केले.

दरम्यान, या प्रकाराबद्दल मा. नगरसेवक राईस सुंडके यांनी पोलीसनामाला सांगितले की, शहरातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. डॉक्टर आपल्या परीने रुग्णांना वाचविण्यासाठी शर्थ करीत आहेत. असे असताना काहीही चुक नसताना त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. कोंढव्यात असा प्रकार घडला, ही घटना दुदैवी आहे.आम्ही रात्री खडी मशीन चौक येथून ऑक्सिजनचा ट्रक जात असता त्यांना विनंती केली त्यांनी 15 सिलेंडर दिले . आम्ही ते कोंढाव्यातील नॅशनल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन ची पूर्तता करून दिली .

नगरसेवक परवीन हाजी फिरोज यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.( No Comments )

नगरसेवक साईनाथ बाबर यांना संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही .