पुण्यात ‘कोरोना’मुक्त झालेल्या पोलिसांकडून नागरिकांना समुपदेशन अन् मानसिक बळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या भयंकर आजारात पुणेकरांच मन प्रसन्न ठेवण्यासोबत त्यांना खंबीर बनविण्यासाठी आता पुणे पोलिसांनी अभिनव उपक्रम हाती घेतला असून, कोरोनामधून मुक्त झालेले पोलीस पुणेकरांना समुपदेशन करत त्यांना मानसिक बळ देणार आहेत. काही दिवसात हा उपक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आलेले दडपण कमी होण्यास मदत होईल.

कोरोनाचा कहर सुरू असून, शहरातील प्रत्येक भागात पोलिस चोख कामगिरी बजावत आहेत. नाकाबंदी, पेट्रोलिंग, वाहन तपासणी, वाहतूक नियमन, कोरोना जनजागृतीला प्राधान्य दिले जात आहे. त्याशिवाय परराज्यातील अडकून पडलेल्या नागरिकांना अन्नधान्य, मास्क व सॅनीटायझर वाटप केले जात आहे. कर्तव्य बजावत असताना सव्वा दोनशे पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर दोनशेच्या जवळपास कर्मचारी यातून बरे झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा कर्तव्य बजावण्यास सुरुवात केली आहे. पण या काळात प्रत्येकावर एक मानसिक दडपण आले आहे. मग ते कोरोनाचे असेल किंवा मग व्यावसायिक व नोकरीचे असेल. त्यामुळे अनेकजण खचून गेले आहेत. हीच अडचण ओळखून आता पुणे पोलिसांनी मानसिक आधार देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलीसांमध्ये कोरोनातून मुक्त झालेले कर्मचारी पुढे आले असून, ते आता पुणेकरांना समुपदेशन करणार आहेत. पहिल्या टप्प्यातील ५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे कर्मचारी नागरिकांचे समुपदेशन करतील. कोरोना बाधितांचे मानसिक आत्मबल उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत.

असे असेल काम…
कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने पोलिस नियंत्रण कक्षातून नागरिकांना फोन करुन कोरोनाबाबात जनजागृती केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांनी अनुभवलेला कोरोना, याबाबतही नागरिकांना माहिती दिली जाईल. तर त्यांना काय खबरदारी घ्यावी याचे आवाहन केले जाणार आहे. पुणेकर नागरिकांना आधार देउन त्यांचे मनोबल उंचावण्यात येईल.

कोरोनामुक्त झालेल्या कर्मचारी नागरिकांना समुपदेशन करतील. पहिल्या टप्प्यात ५० कर्मचाऱ्यांकडून समुपदेशनाची जबाबदारी पार पाडली जाणार आहे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, विनाकारण प्रवास, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षितता बाळगण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे. कोरोनाची जनजागृती करण्यास पोलिसांकडून भर दिला जात आहे.
डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त,