गळा चिरून खून करत पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पुण्यातील दाम्पत्यास जन्मठेपेची शिक्षा

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाइन – गळा चिरुन खून करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने पुण्यातील दाम्पत्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रकाश सुर्यकांत चापेकर (वय 40, रा. येरवडा), दत्ता सुभाष लोहार (वय 33) व प्रकाश याची पत्नी प्रतिभा प्रकाश चापेकर (वय 31) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता..

उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली गावात सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहीरीतील पाण्यात एका तरुणीचा पोत्यात गुंडाळलेला मृतदेह 2015 साली आढळून आला होता. या तरुणीचा गळा चिरुन खुन केल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला काही महिने या तरुणीची ओळखच पटत नव्हती. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. यामुळे या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिला होता. आरोपीने नियोजनबध्द रितीने खुनकरुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तागाच्या पोत्यात भरुन विहीरीच्या पाण्यात टाकला होता. तरुणीच्या अंगात असलेल्या एल मापाच्या जयपूर कुर्तीवर तपास केंद्रीत करण्याचे व ऑनलाईन सोशल मिडीयाचा वापर करण्याचे पोलिसांनी ठरवले. या कुर्तीची छायाचित्रे ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्यांना पाठवून संपर्क केला. या प्रकारच्या कुर्ती (सदरा) खरेदी करणाऱ्या ग्राहकांची माहिती घेण्यात आली. फ्लिपकार्ट कंपनीने ही कुर्ती ऑनलाईन विकली असल्याचे कळवले. कंपनीकडून अशी कुर्ती खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खात्याची माहिती मागवण्यात आली. त्यात एका संशयीत ग्राहकाचा मोबाईल क्रमांक मिळाला. या संशयीत मोबाईल क्रमांकाच्या अभिलेखावरुन वाघोली गावाचा जावई व मूळचा पुण्याचा असलेला प्रकाश चापेकर याच्या मोबाईलवर खुनाच्या घटनेच्या काळात वेळोवेळी संपर्क झाल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी प्रकाशला ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी त्याने मयत तरुणी ही त्याची प्रेयसी होती. तसेच ती देखील पुण्याचीच होती. काही कालावधीनंतर ती प्रकाश याचा पिच्छा सोडत नव्हती. त्यामुळे तिघांनी खुनाचा कट रचला. प्रकाश हा त्या तरुणीस फुस लावून वाघोली शिवारात घेउन आला. तिघांनी तीचा गळा चिरुन खुन केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तीचा मृतदेह तागाच्या पोत्यात भरुन विहीरीत टाकला असे सांगितले.

हा खटला उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकिल जयंत देशमुख यांनी बाजू मांडली. न्यायालयाने तीन्ही आरोपींना फौजदारी पात्र कट रचने, खुन करणे, पुरावा नष्ट करणे याकलमा खाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.