Pune : न्यायालयाती कोर्ट हॉल, बार रुम आणि पार्किंगची समस्या मिटणार; नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 96 कोटी रुपयांचा निधी मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवाजीनगरमधील जिल्हा न्यायालयाच्या चार नंबरच्या प्रवेशद्वार ते लॉयर्स चेंबर बिल्डिंग ए पर्यंतचे सर्व जुने बांधकाम पाडून त्याजागी पाच मजली भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये कोर्ट हॉल, बार रुम, सभागृह, पार्किंगची सोय असणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल ९६ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.

बांधकाम सुरू करण्यासाठी अद्याप निधी वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे बांधकामासाठी सुरुवातीला काही निधी उपलब्ध करून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्राद्वारे विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नवीन इमारतीचे डिझाइन तयार करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात प्रमुख जिल्हा न्यायाधिशाबरोबर याबाबत बैठक झाली. गेट नंबर चार, बराक कोर्ट, बार असोसिएशनचे कार्यालय आणि लॉयर्स चेंबर बिल्डिंग एपर्यंत असलेले जुने बांधकाम पडण्यास जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे, असे त्यात प्रमुख जिल्हा न्यायधीशांनी सांगितले. जुने बांधकाम पडण्यास सुरुवात झाल्यावर बार असोसिएशनचे कार्यालय काही दिवसासाठी इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. तर लॉयर्स चेंबर बिल्डिंग एमधील ११ चेंबरचा प्रश्‍न निर्माण होणार असून चेंबरधारक वकील आणि जिल्हा न्यायाधीश यांची त्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, असे ॲड. मुळीक यांनी सांगितले.

दीड हजार दुचाकी व ६०० कारच्या पार्किंगची व्यवस्था :

नव्या इमारतीमध्ये दोन मजली पार्किंगची व्यवस्था असून त्यामध्ये सुमारे दीड हजार दुचाकी आणि ५०० ते ६०० कार पार्किंगची व्यवस्था असणार आहे. तसेच न्यायालयातील विविध कार्यक्रम अशोका हॉलमध्ये आयोजित केले जातात. मात्र हा हॉल छोटा असल्यामुळे गैरसोय होते. त्यामुळे नव्या इमारतीमध्ये ५०० ते ६०० आसन व्यवस्था असलेला हॉल उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही ॲड. मुळीक म्हणाले.