Pune : सुनेच्या मृत्यूचा बनाव करणार्‍या सासरच्या मंडळींचा अटकपुर्व जामीन फेटाळला; शिरूर तालुक्यातील सणसवाडीतील घडली होती घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  गळफास लावून आत्महत्या केलेल्या गर्भवती विवाहितेचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला असल्याचा बनाव करणा-या सासरच्या तिघांचा अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा निकाल दिला. कल्पना बबुशा दरेकर (सासू), राहूल बबुशा दरेकर (दिर), कोमल राहुल दरेकर (जाऊ) (सर्व रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) अशी अटकपुर्व जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. चैत्राली योगेश दरेकर (वय २६) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणात विवाहितेचा पती योगेश बबुशा दरेकर (वय ३०) याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे.

एक मे २०२१ रोजी शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावात ही घटना घडली. मुल होत नसल्याच्या कारणावरून चैत्राली यांना सासरच्या मंडळींकडून शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरवात झाली. त्यास कंटाळून त्यांनी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, आरोपींनी चैत्राली यांनी गळफास घेतलेली दोरी कापुन त्यांचा मृतदेह खाली उतरविला. गळ्यातील दोरू काढून त्यांना घरात झोपविले. त्यानंतर मुल होण्याच्या उपचारामुळे रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा बनाव करत फर्शीवर पाणी ओतून पुरावा नष्ट केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपींकडून अर्ज करण्यात आला. त्यास सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पसार झाले आहेत. संबंधित गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून आरोपींनी चैत्राली यांचा शारिरीक व मानसिक छळ करून तिचे जगणे असह्य करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. चैत्राली ही उच्चशिक्षित असल्याने तिने आत्महत्या करण्यापुर्वी यातील आरोपी विरुध्द चिठ्ठी लिहून ठेवली असण्याची शक्यता आहे. त्याचा तपास करायचा असल्याने त्यांना पोलिस कोठडीची गरज आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. सप्रे यांनी केला. तो न्यायालयाने ग्राह्य धरत अटकपुर्व जामीन फेटाळला. या तपास शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक के. के. भालेकर तपास करीत आहेत.