Coronavirus Lockdown : घराबाहेर पडताना ‘मास्क’ लावला नाही, पुण्यातील युवकाला 48 तासात न्यायालयानं सुनावली ‘ही’ शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधितांची संख्या झपाटयानं वाढत आहे. राज्य शासनाने मुंबई आणि पुण्यातील नागरिकांना अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडताना मास्क परिधान करा असे आदेश दिले आहेत. नियमांचा भंग करणार्‍यांविरूध्द कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आलं होतं. मात्र, त्याची बहुतांश ठिकाणी पायमल्ली केली जात असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणार्‍या 31 वर्षीय युवकास न्यायालयानं शिक्षा ठोठावली असून त्याला एक हजार रूपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

महेश शांताराम धुमाळ (31, रा. नाना पेठ) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. मुंबईनंतर पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित आहेत. पुण्यातील काही परिसर सील देखील केला आहे तर काही परिसरात कर्फ्यू लावण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत महेश धुमाळ हा दि. 11 एप्रिल रोजी सायंकाळी इस्ट स्ट्रीट रस्त्यावरून मास्क न घालता दुचाकीवरून फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याविरूध्द कायदेशीर कारवाई केली. पोलिस कर्मचारी गणपत थिकोळे यांनी पोलिस ठाण्यात त्याच्याविरूध्द फिर्याद दिली.

पोलिसांनी धुमाळविरूध्द भादंवि 270, 188, 269 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अवघ्या 48 तासाच्या आत लष्कर न्यायालयात आरोपपत्र सादर केलं. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने धुमाळ याला 1000 रूपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे धुमाळला पारपत्र (पासपोर्ट) आणि नोकरीच्या वेळी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढताना असंख्य अडचणी येणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पोलिस प्रशासनानं सर्व पुणेकरांना अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे असे आवाहन केले आहे.