Pune : आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार नाहीत; पुणे महापालिकेचा निर्णय, पर्यायी जागेचा शोध सुरु

पुणेः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करणार नसल्याचे पुणे महापालिकेने स्पष्ट केले आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महापालिका आता अंत्यसंस्कारांसाठी पर्यायी व्यवस्थेचा विचार करत आहे.

पुण्यातील नवी सदाशिव पेठ परिसरात मुळा- मुठा नदीच्या जवळ ही स्मशानभूमी आहे. याठिकाणी रोज जवळपास 80 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. त्यामुळे येथे अंत्यसंस्कारासाठी जवळपास 5 हजार लोकांची ये- जा असते. या सर्वांकडून कोरोना नियमांचे व्यवस्थितपणे पालन होत नाही. तसेच या भागातील लोकसंख्येचे प्रमाण पाहता संसर्ग पसरण्याची भीती असल्याने या परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन महापालिकेने अखेर येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली तेंव्हापासून या स्मशानभूमीत दररोज कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जवळपास 40 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. महापालिकेने यासाठी पर्यायी व्यवस्था केल्याचे सांगत नातेवाईकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही, असे आश्वासन दिले आहे. इतर कोणत्या स्मशानभूमीत मृतदेह पाठवायचे हे रुग्णालयांनाच सांगण्यात आले असून सर्व मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची योग्य सोय केली जाईल, असे पालिकेने सांगितले आहे.