Pune : मार्केट यार्डात होणार कोविड लसीकरण केंद्र अन् दवाखाना, बाजार समितीचे प्रशासक गरड यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   दि पूना मर्चंट चेंबर यांच्या सहकार्याने पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात हमाल भवन येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच बाजारात काम करणाऱ्या सर्व घटकांसाठी दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हा दवाखाना सुरू होईल. त्यामुळे बाजार घटकांनी या दवाखान्यात तपासणी करून उपचार घ्यावे,असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी केले आहे. दरम्यान बाजार आवारात कोरोना रॅपिड टेस्ट केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरु असल्याची माहिती गरड यांनी दिली.

बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 26) महापालिका प्रशासन आणि बाजार घटक संघटनांची बैठक झाली. यावेळी महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव, मेडिकल झोनल अधिकारी डॉ. राजेश दिघे, डॉ. अमित उदावंत, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, वालचंद संचेती, राजेंद्र बाठीया, रायकुमार नहार, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, संतोष नांगरे, संजय साष्टे, राजेंद्र चोरघे उपस्थित होते. महापालिका अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार येत्या तीन दिवसांत कोविड लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. 1 मे पासून18 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रथम प्राधान्याने 45 वर्षांपुढील अडते, कामगार, व्यापारी यांचे लसीकरण होईल. त्यांनतर इतरांना लस देण्याबाबत अ आणि ब वर्गवारीनुसर माहिती संकलित करण्याच्या सूचना बाजार घटक संघटनांना दिल्या आहेत. तसेच सर्वांनी आपण राहत असलेल्या भागात लस उपलब्ध होत असेल तर घ्यावी, असे गरड यांनी सांगितले.