… म्हणून पोलिस आयुक्तांनी कर्मचारी केली थेट मुख्यालयात रवानगी, पोलिस दलात वेगळीच ‘कूजबूज’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अक्षय फाटक) – गर्दीच्या अन धुळीच्या चौकात कर्तव्य बजावणार्‍या वाहतूक विभागातील एका सहायक फौजदारावर पोलीस आयुक्तांची नजर गेली अन थेट त्याची रवाणगी शिवाजीनगर मुख्यालयात करण्यात आली आहे. यापेक्षा बदलीचे कारण सर्वांना समजल्यानंतर मात्र पोलीस कर्मचार्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्याबाबत खासगीत कर्मचारी वर्गात ” कुजबूज” सुरू झाली आहे.

सहायक फौजदार संपत साबळे असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. पुण्याचा पदभार स्विकारल्यानंतर डॉ. के. व्यंकटेशम यांनी पोलीस दलाला शिस्त लावली. पोलीस दलाचा चेहरा मोहरा बदलला. पेडींग कामे करून घेतली अन नुस्ता गाजावाजा करणार्‍यांना वेळ पुरणार नाही, इतकी कामे लावली.

इतकेच नव्हे आतापर्यंत कोणत्याच पोलीस आयुक्तांनी केली नाही, इतकी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अन बेशिस्तांना आळा घालण्यासाठी त्याहून अधिक हेल्मेट परिधान करावे, यासाठी कारवाईची तीव्र मोहिम हाती घेतली. हेल्मेटच्या विरोधात असणार्‍या पुणेकरांना हेल्मेटसक्ती केलीच, पण फक्त हेल्मेटमधून 81 कोटींहून अधिक दंड ठोठावला. त्यातला 59 कोटींचा दंड वसूल करणे बाकी आहे. पण, तोही वसूल करण्यासाठी आता वेगवेगळे मोहिम राबविली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, वाहतूक विभागात सर्वच काही आलेबेल नसल्याचे भारती विद्यापीठ वाहतूक विभागातील एका निरीक्षक अन कर्मचार्‍यांमधील वादातून समोर आले. त्याकडे कोणत्याच वरिष्ठाने अद्याप तरी गांभिर्याने पाहिलेले दिसत नाही. दुसरीकडे मात्र कर्मचार्‍यांना रोज-वेगवेगळे टार्गेट देऊन काम करून घेतले जात आहे. चौकात कर्मचारी पाहिजे हाही त्यातलाच भाग.

साबळे हे बंडगार्डन वाहतूक विभागात कर्तव्यास होते. त्यांची 27 वर्षांहून अधिक सेवा झाली आहे. निवृत्तीचे काही वर्ष शिल्लक आहेत. बंडगार्डनअंतर्गत ते रविवारी मालधक्का चौकात कर्तव्य करत होते. त्याचवेळी पोलीस आयुक्तांची ताफा तेथून जात होता. यावेळी आयुक्तांची नजर कर्तव्यास असलेल्या साबळे यांच्यावर गेली. साबळे यांचे कपडे मात्र ” मळके” आढळून आले. त्यामुळे आयुक्तांनी त्यांच्या गाडी मागे असणार्‍या व्हॉनमधील कर्मचार्‍याला त्यांना उद्या भेटण्यास बोलविण्यास सांगितले. त्यानुसार साबळे यांना पोलीस आयुक्तांनी बोलाविल्याचा निरोप गेला. साबळे सोमवारी आयुक्तांना भेटले. त्यावेळी त्यांना तुम्ही कपडे मळके घातले. उद्यापासून मुख्यालयात जाल असा आदेश देण्यात आला. साबळे यांनी मात्र, काही एक न बोलता मुख्यालयाचा रस्ता धरला. त्यांच्या अधिकृत बदलीचे आदेश मंगळवारी रात्री पोलीस आयुक्तांनी काढले.

साबळे यांची मुख्यालयात बदली ही कपडे मळके असल्याने झाल्याची माहिती सर्वत्र झाली. त्यानंतर मात्र, कर्मचारी अन अधिकार्‍यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. एका कर्मचार्‍याने हा अन्यायच असल्याची भावना व्यक्त केली आहे. यामुळे मात्र नाराजीचा सुर उमटला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/