चाकण MIDC मध्ये कंपनी मालकाचा 7 जणांकडून डोक्यात दगड घालून खून

पुणे/चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण एमआयडीसीमध्ये सात जणांच्या टोळक्याने कंपनीत घुसून कंपनी मालकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. भांडणाच्या रागातून सात जणांनी कंपनी मालकाचा कंपनीतच दगडाने ठेचून खून केल्याने एमआयडीसीमध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार चाकण एमआयडीसी मधील व्हीएचडी इंजिनिअरिंग वर्कशॉप कंपनीत घडला.

हरिशचंद्र किसन देटे (वय-45 रा. भैरवनगर, लेन नं. 5 धानोरी विश्रांतवाडी, मळ रा. रुई ढोकी. ता. जि. उस्मानाबाद) असे खून झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. याप्रकरणी जीवन डोंगरे, अश्विन कांबळे, शरद धुळे आणि त्याच्या आणखी दोन ते तीन साथीदारांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि मयत यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास हरिशचंद्र देटे यांचा दगडाने ठेचून खून केला.
समोवारी दुपारी तीनच्या सुमारास जीवन डोंगरे हा त्याच्या इतर साथीदारांना घेऊन कंपनीत गेला. त्यावेळी मृत हरिशचंद्र हे वर्कशॉपमध्ये काम करत होते.

आरोपींनी त्यांच्या सोबत वाद घालून त्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर आरोपी जीवन डोंगरे याने हरिशचंद्र यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.