Pune : मारहाण करून 13 लाख रुपये चोरल्याप्रकरणी दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मला कट का मारला, हे विचारण्यासाठी कार चालकास थांबवून त्यांना मारहाण करण्यातच आली. तसेच चालकास बोलण्यात गुंतवून ठेवत १३ लाख ५० हजारांची रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाने दोघांना अटक केली. न्यायलयाने त्यांना २९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

प्रदिप उर्फ बाबु यशवंत कोंढाळकर (वय २३, रा. केसनंद) आणि इशाप्पा उर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय १९, रा. यशवंतनगर, वाघोली) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी आणखी तिघांविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक सोमनाथ आबाजी मुळीक (वय ४६, रा. वाणेवाडी रोड, केसनंद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोलीतील उबाळेनगर येथे ३० एप्रिल रोजी ही घटना घडली. इशाप्पा हा पोलिलांच्या रॅकार्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात एमआयडीसी अहमदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी. तसेच चोरलेली १३ लाख ५० हजारांची रक्कम जप्त करण्यासाठी अटक आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.