Pune : पिस्तूल बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिस्तुल बाळगणाऱ्या सराइत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सापळा रचून अटक केली. कोथरूड भागात ही कारवाई केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल व काडतुस जप्त करण्यात आले.

अथर्व सुनिल बहिरट (वय २०, रा. शिवाजीनगर गावठाण) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहिरट सराइत आहे. त्याच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

शहरातील गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. पौड रस्त्यावर बहिरट थांबला असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल असल्याची माहिती पोलीस नाईक विल्सन डिसोझा यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण अडागळे यांनी सापळा लावून त्याला पकडले. बहिरट याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि काडतुस जप्त करण्यात आले आहे.