Pune : ‘हाफ मर्डर’च्या गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून गुन्हेगारी टोळीने तीक्ष्ण हत्यारे व कोयते डोक्यात घालून खून करण्याच्या प्रयत्नकरून पसार झालेल्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

प्रवीण सुधाकर लोंढे (रा. धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. लोंढे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न तसेच हाणामारी यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी सोमवारी एका तरुणावर कोयत्याने वारकरत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हा तरुण फक्त शेजाऱ्यांनी दार उघडून घरात घेतल्याने वाचला होता. त्यानंतर टोळके पसार झाले होते. त्यांचा शोध गुन्हे शाखा घेत होती. त्यावेळी कर्मचारी प्रफुल्ल चव्हाण व विवेक जाधव यांना प्रवीण लोंढे हा नांदेड सिटी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुुुसार पथकाने त्याला सापळा रचून अटक केली आहे.

ही कारवाई अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहाय्यक निरीक्षक संदीप बुवा, पोलीस नाईक नितीन कांबळे, नितीन रावळ, राजेंद्र लांडगे, यांच्या पथकाने केली आहे.