Pune : लुटमरीच्या उद्देशाने कार चालकाचा खुन, सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – लुटमरीच्या उद्देशाने कार चालकाचा खुनकरून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनने सापळा रचून अटक केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातून बाहेर आला होता. यानंतर देखील त्याने शहरात गुन्हे केले आहेत.

ऋषीकेश जयराज कामठे (वय 34, रा. कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यघटनेत नागेश दगडू गुंड (वय 37, रा. मूळ. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) याचा खून झाला होता. याप्रकरणी मित्र कमलाकर घोडके यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

नागेश हा बदली कार चालक म्हणून काम करत असे. लॉकडाऊनमुळे तो गावी गेला होता. काम मिळाल्यानंतर पुण्यात येत असे. औन्ध येथील बदली चालक म्हणून काम मिळाले होते. त्यामुळे तो तुळजापूरवरून (दि. 3 सप्टेंबर) पुण्यात आला होता. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तो स्वारगेट बस स्थानक परिसरात उतरला. त्याला घेऊन जाण्यासाठी मित्र कमलाकर घोडके येणार होते. म्हणून तो वाट पहात थांबला होता. यावेळी अचानक दुचाकीवर एकजण चोरीच्या उद्देशाने आला. त्याने मोबाईल हिसकवला. पण नागेश यांनी विरोध केल्यानंतर त्याने तीक्ष्ण हत्यारे वार केले होते. यात रक्त स्त्राव होऊन नागेश यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. यावेळी त्यांना हा खून सराईत गुन्हेगार कामठे याने केला असल्याचे समजले. त्याची माहिती काढण्यात येत होती. त्यावेळी तो कोथरुड येथील जुना कचरा डेपो येथे असल्याचे समजताच त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.

ऋषीकेश कामठे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीचे 16 गुन्हे दाखल आहेत. तो कोथरुड पोलीस ठाण्याच्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो काही महिन्यांपूर्वी बाहेर आला होता. यानंतर देखील तो गुन्हे करत होता. त्याने येरवडा हद्दीत देखील एका जबरी चोरीचा गुन्हा केला आहे. तो सिंहगड रोड पोलिसांच्या एका गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे. त्याला पुढील कारवाई करण्यासाठी स्वारगेट पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी व त्यांच्या पथकाने केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like