मुंबईच्या नागरिकाला लुटून पसार झालेल्या सराईताला पिस्तूलासह अटक; गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमधील एका व्यक्तीला लुटल्यानंतर त्याला नदीच्या कडेला फेकून देत पसार झालेल्या सराईताला सहा महिन्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 2 पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अनिकेत जगन्नाथ काकडे (वय 23, रा. शेलार चाळ, येरवडा) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सहा महिन्यांपूर्वी बेलापूर येथील राजेश म्हात्रे ही व्यक्ती कामानिमित्त पुण्यात आली होती. त्यांनी मद्यधुंद अवस्थेत स्वारगेटवरून रिक्षा पकडली. पण आरोपींना त्याच्याकडे पैसे दिसले. त्या व्यक्तीला इच्छितस्थळी न सोडता त्याना कोरेगाव पार्क परिसरात घेऊन गेले. आणखी दारू पाजून त्याच्याकडील 4 लाख घेऊन त्याना झुडपात टाकून दिले होते. थंडीने त्याचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात दोघांना अटक केली होती. पण, काकडे हा सहा महिन्यांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यात येत होता.

या दरम्यान गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला काकडे हा इराणी मार्केट येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे अतिरिक्त अशोक मोराळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, सुनिल पवार, विशाल शिर्के, रमेश राठोड, सागर घोरपडे यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल व दोन काडतुसे मिळाली. स्थानिक वादातून त्याचा भाऊ आदर्श काकडे याचा खून झाला होता. त्यामुळे तो पिस्तूल बाळगून होता. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने दुसरे पिस्तूल खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार ते पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक गणेश पवार हे करत आहेत.