पुण्यात गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत वाहन चोरटे जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्हे शाखेने राबविलेल्या विषेष मोहिमेत शहरातून पार्किंग केलेली वाहने चोरणार्‍या सराईत वाहन चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून 5 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दिपक बाबाराव कांबळे (वय 27, रा. सुसगाव. ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. त्याचा साथीदार पवन हरबडे याचा शोध घेण्यात येत आहे.

शहरात घरफोड्या आणि वाहन चोर्‍यांचा सुळसुळाट सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेले सत्र काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. तत्पुर्वी या चोरट्यांना पकडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेकडून अचानक विशेष मोहिम राबवत सराईत गुन्हेगार व पाहिजे असलेल्या गुन्हेगारांची झाडाझडती घेत आहेत. यादरम्यान, युनिट दोनचे पथक लष्कर परिसरात माहिती घेत होते.

वेळी पोलीस शिपाई कादीर शेख यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इस्कॉन मंदिराजवळ एक व्यक्ती उभी असून, त्याच्याजवळ दुचाकी आहे. त्यानुसार, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहाय्यक फौजदार संजय दळवी, अतुल गायकवाड, गोपाळ मदने व त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकीबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. सखोल तपासात साथीदार पवन याच्यासोबत दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. त्याच्याकडून 2 लाख 70 हजार रुपयांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.